दुकानमालकाने अधिकार्यांचा मोबाईल फोडला
मडगाव : बाळ्ळी येथील एका दुकानात अन्न व औषध खात्याच्या अधिकार्यांनी पाहणी करत काही मद्याच्या बाटल्या व इतर वस्तूंचे नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र, दुकानमालक आल्यावर त्याने अधिकार्यांना रोखले व चित्रण करताना मोबाईलही पाडला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांंत तक्रार नोंद असून तपास सुरू आहे.
बाळ्ळी येथील प्रशांत नाईक यांच्या दुकानात अन्न व औषध खात्याचे अधिकारी पाहणीसाठी गेले होते. त्यांनी तपासणीसाठी काही मद्याच्या बाटल्या व इतर साहित्य घेतले. ते नमुने सीलही केले. त्यानंतर हे नमुने घेऊन अधिकारी दुकानातून जाताना दुकानमालक नाईक घटनास्थळी दाखल झाले. सदर कारवाई अबकारी खाते करू शकते, तुम्ही करू शकत नाही, असे सांगत नमुने घेऊन जाऊ देणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी एफडीएच्या अधिकार्यांनी या घटनेचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली असता, नाईक त्यांच्या अंगावर धावत गेले. मोबाईल खाली पाडला. या प्रकारानंतर एफडीए अधिकार्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्याठिकाणी कॉन्स्टेबल आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाला बोलावून घेण्यात आले. एफडीएच्या वरिष्ठ अधिकार्यांनाही झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार, दुकानमालकाविरोधात अधिकार्याने कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. कुंकळ्ळी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. सध्या या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. एफडीए अधिकार्यांना विचारणा केली असता कारवाई करण्यासाठी गेल्यावर अशाप्रकारची घटना घडल्यास सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.