डिचोली पोलिसांची कामगिरी
डिचोली : न्हावेली साखळी येथे एका मजुराला गंभीर मारहाण करून पळ काढलेल्या दोन बिगरगोमंतकीय मजुरांना अवघ्या २४ तासांत धारवाड कर्नाटक येथून अटक करून गोव्यात आणण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. डिचोलीचे पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांनी हाती घेतलेल्या या आव्हानात्मक शोध मोहिमेला मोठे यश आले.
न्हावेली साखळी येथील मांगिरीष प्रकाश गावस यांनी तक्रार केली होती. धारवाड कर्नाटक येथील अब्दुल हमीद या मजुराला गंभीरित्या मारहाण करून दोन मजुरांनी पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले होते. हा मारहाणीचा प्रकार ४ जून रोजी घडला होता.
या प्रकरणाची तक्रार डिचोली पोलीस स्थानकात दाखल होताच पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांनी उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके स्थापन केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत, विराज धावसकर, आकाश परवार, रश्मीर मातोंडकर, आपा शिंदे, हवालदार नीलेश फोगेरी, आत्माराम गावस, पोलीस कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर, शैलेश दावणे यांची विविध पथके करून तांत्रिक तसेच मानवी माध्यमांचा उपयोग करून पळून गेलेल्या दोन्हीही संशयितांची माहिती मिळवली.
सदर संशयित हे धारवाड कर्नाटक येथे असल्याचा सुगावा लागताच पोलीस उपनिरीक्षक रश्मीर मातोंडकर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश गावकर व प्रशांत गावकर हे धारवाड कर्नाटक येथे रवाना झाले. तेथे सुमारे १२ तास शोध मोहीम हाती घेऊन माहिती मिळवली. दोन्हीही संशयितांना शोधून काढण्यात यश मिळविले. त्यात धारवाड कर्नाटक येथील सादिक मेहमूद अली व अब्दुलरजाक जुम्मामिया सिंधी (वय २८) या दोघांनाही ताब्यात घेऊन विद्यागिरी पोलीस स्थानक धारवाड येथे ४ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अटक केली.
त्यानंतर ५ जून रोजी या दोन्हीही संशयितांना धारवाड येथील तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. तेथील कारवाईनंतर डिचोली पोलीस स्थानकात संध्याकाळीच आणण्यात आले.
खुनी हल्ला झालेले अब्दुलहमीद यांच्यावर सध्या बांबोळी येथील गोमेको इस्पितळात उपचार सुरू आहेत.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता तसेच डिचोली पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा, निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश परवार पुढील तपास करीत आहेत.
संशयितांची धारवाड कर्नाटकपर्यंत धाव
या प्रकरणात डिचोली पोलिसांकडे कोणतेही धागेदोरे नव्हते. ४ जून रोजी मायणा न्हावेली येथे एका मजुरावर खुनी हल्ला करून दोघांनी पळ काढला होता. डिचोली पोलिसांनी पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करताना या संशयित आरोपींची संपूर्ण माहिती मिळवत ते लपून बसलेल्या धारवाड कर्नाटकपर्यंत धाव घेतली. त्या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.