दोन कार जप्त : इतर संशयितांचा शोध सुरू
म्हापसा : बस्तोडा येथे रोडरेजवरुन गर्भवती महिलेसह तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिन्ही संशयितांना म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात वापरलेल्या दोन कार पोलिसांनी जप्त केल्या असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी पिराझोन-मयडे येथील रंगनाथ विश्वनाथ शेट्ये (५५), विनोद नारायण शेट्ये उर्फ शेटकर (४७) व कौशल तुळशीदास शेट्ये (३२) या तिघांना मंगळवारी रात्री अटक केली होती. म्हापसा पोलिसांनी बुधवारी या हल्ल्यासाठी वापरलेल्या जीए ०३ एएफ २३६० व जीए ०३ झेड ४१३९ क्रमांकाच्या कार जप्त केल्या आहेत. या गाड्या तुळशीदास शेट्ये व कार्तिक शेट्ये यांच्या मालकीच्या आहेत. बुधवारी तिघाही संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाने दिला आहे.
फिर्यादी श्रुती शिरोडकर (नास्नोळा) व त्यांचे पती विवेक शिरोडकर हे दोघेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित कुटुंबीयांनी मंगळवार, ३ रोजी संशयितांपैकी तुळशीदास, कार्तिक व रुत्विक अशा तिघांची नावे पोलिसांना दिली होती.
दरम्यान, हे प्रकरण २ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास तार बस्तोडा जंक्शन जवळील मयडे रस्त्यावरील फिर्यादींच्या गाळ्याजवळ घडले होते. पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.सं.च्या १२६(२), ३५२, ३५१(३), ११८(२) व ३(५) कलमान्वये अज्ञात २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब हे करीत आहेत.