'क्रिप्टो'च्या बदल्यात संवेदनशील माहिती विकण्याचा प्रयत्न

अहमदाबादमधील एकाला गोव्यात अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th June, 04:47 pm
'क्रिप्टो'च्या बदल्यात संवेदनशील माहिती विकण्याचा प्रयत्न

पणजी: गोवा सायबर क्राइम पोलिसांनी एका मोठ्या सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश करत अहमदाबादचा रहिवासी विशाल गोहिल (वय ४२) याला ४ जून रोजी कळंगुट येथून अटक केली आहे. आरोपी संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवून ती क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यात विकण्याचा प्रयत्न करत होता.

प्राथमिक तपासात असे आढळले आहे की, विशाल गोहिलने टेलिग्रामसह विविध एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती विक्रीसाठी ठेवली होती आणि व्यवहार लपवण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करत होता. त्याच्यावर आयटी कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याच्या डिजिटल वावराची तपासणी सुरु आहे.

आरोपीचे सहकारी किंवा व्यवहारादरम्यान अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर झाला आहे का, याचा शोधही पोलिसांकडून सध्या सुरू आहे. या कारवाईत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षत आयुष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. 

गोवा पोलिसांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद सायबर व्यवहार दिसल्यास रायबंदर येथील सायबर क्राइम पोलीस स्टेशन किंवा हेल्पलाइन नंबर १९३० वर तात्काळ संपर्क साधण्यास सांगितले आहे.


हेही वाचा