मडगाव : कोलवा येथील चॅपेलनजीक एका बाकावर डिसिल्वा नामक कुटुंबीयांना सुमारे आठ महिन्यांचे मूल आढळून आले. त्यांनी पंचसदस्यांसह कोलवा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सदर मुलाला नेले असून त्याच्या पालकांचा शोध घेण्यात येत आहे.
कोलवा फर्स्टवाडो येथील चॅपेलनजीकच्या बाकावर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक लहान मूल आढळून आले. त्याच्या आजूबाजूला कुणीही नव्हते. जॉन डिसिल्वा यांची पत्नी व बहिण रात्रीच्या सुमारास चॅपेलनजीकच्या रस्त्यावरुन दुचाकीवरुन जात असताना त्यांना बाकावर काहीतरी ठेवण्यात आल्याचे दिसले. सुरुवातीला त्यांना ती बाहुली असल्याचे वाटले, त्यामुळे गाडी वळवून पुन्हा त्यांनी पाहण्याचे ठरवले. गाडीची लाईट पडताच मुलाने हालचाल केली. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता नजीक कुणीही आढळून आले नाही. यानंतर पंचसदस्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आले. पंचसदस्यांनी कोलवा पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाला आपल्यासोबत नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ते मूल दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ठेवण्यात आले आहे. त्याचा सांभाळ करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडे ताबा देण्यासंदर्भात पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. मुलाच्या पालकांचा शोध घेण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.