अस्वच्छतेमुळे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश
मडगाव : अन्न व औषध खात्याकडून मडगाव येथील ओल्ड स्टेशन रोडवरील जनता फॅमिली रेस्टॉरंटची पाहणी करण्यात आली. यावेळी अस्वच्छता व अन्न सुरक्षा निकषांचे उल्लंघन दिसून आले. यापूर्वी सांगूनही सुधारणा न करण्यात आल्याने रेस्टॉरंट बंद करण्याचे निर्देश सदर रेस्टॉरंट मालकाला देण्यात आले.
अन्न व औषध खात्याकडून मडगावातील हॉटेल्सची पाहणी करण्यात आली. यापूर्वी काही हॉटेल्सना सुधारणा करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही पडताळणी करण्यात आली. या कारवाईत अधिकारी संज्योत कुडाळकर, अतुल देसाई, प्रदिक्षा चोपडेकर व अमरदीप गावडे यांनी सहभाग घेतला होता.
मडगाव कॅफेच्या मागील बाजूला असलेल्या खोलीत जेवण केले जात असल्याची माहिती मिळाली होती. पाहणी करण्यात आली असता सदर खोलीत कामगार राहत असून त्यांनी याठिकाणी हॉटेलचे जेवण केले जात नसल्याचे सांगितले. त्याठिकाणी अस्वच्छता दिसून आल्याने कामगारांसाठीही अशा जागेत जेवण केले जाऊ नये, अशा सूचना अन्न व औषध खात्याच्या अधिकार्यांनी दिल्या.
अन्न व औषध खात्याच्या अधिकार्यांनी यानंतर ओल्ड स्टेशन रोडवरील जनता फॅमिली रेस्टॉरंटची पाहणी केली. त्यावेळी सुधारणा करण्याची संधी देऊनही सुधारणा झालेली नसल्याने रेस्टॉरंट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. दुसर्या वेळी २० हजारांचा दंडही केला होता, पण तोही भरण्यात आला नाही. ३० मुद्दे सुधारणा करण्यासाठी दिलेले असताना केवळ पाच सुधारणाच करण्यात आल्या. त्यामुळे आता रेस्टॉरंट बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
यापुढे आणखी रेस्टॉरंट व हॉटेल्सची पडताळणी करण्यात येईल, असे अधिकारी संज्योत कुडाळकर यांनी सांगितले.