पेडणे : हरमल किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमाराला सहा पर्यटकांनी केली मारहाण

दोघांना घटनास्थळावरून, चार जणांना कोल्हापूरमधून अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th June, 02:00 pm
पेडणे : हरमल किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमाराला सहा पर्यटकांनी केली मारहाण

पेडणे :  हरमल समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक मच्छिमाराला सहा पर्यटकांनी मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. एका होडीची जागा बदलण्यावरून सुरू झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यवसान शिवीगाळ व मारहाणीत झाले . या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी महाराष्ट्रातील सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. यापैकी दोन आरोपींना घटनास्थळीच अटक करण्यात आली, तर उर्वरित चार जणांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे.

ही घटना ३ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. खालचावाडा-हरमल येथील लॉरेन्स फर्नांडिस (वय ४०) हे त्यांच्या होडीला सावलीत नेण्यासाठी ती बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, होडीजवळ बसलेल्या काही पर्यटकांनी याच कारणावरून लॉरेन्स यांच्यासोबत सुरुवातीला वाद घातला. नंतर शिवीगाळ केली व त्यांच्यावर हल्ला चढवला. सौरभ वाळेकर (वय २४) आणि सागर झळके (वय २५) या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप लॉरेन्स फर्नांडिस यांनी तक्रारीत केला आहे.

तक्रारीच्या आधारे मांद्रे पोलिसांनी ४ जून रोजी उत्तर रात्री १.१९ वाजता संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५२, ११८(१), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर सौरभ वाळेकर व सागर झळके यांना लगेच घटनास्थळावरुन अटक करण्यात आली. मात्र इतर चार आरोपी फरार झाले. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथक पाठवले. पोलिसांनी शिताफीने माग काढत कोल्हापूर येथून कृष्णात वायगडे (रा. कोल्हापूर), राजेंद्र रावळ (रा.हुपरी), कृष्णनाथ वायगडे  (रा.हुपरी) आणि शिवानंद भंडारी (रा.हुपरी) यांना ताब्यात घेतले. आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकारामुळे हरमल परिसरात संतापाचे वातावरण आहे. स्थानिक मच्छिमार व मत्स्यव्यावसायिकांनी या प्रकाराचा निषेध केला असून, पर्यटकांनी स्थानिकांशी वागताना संयम बाळगावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा