धाकट्या भावावर परवानाधारक बंदुकीतून झाडल्या गोळ्या

वेर्णा पोलिसांकडून संशयितास अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th June, 12:23 am
धाकट्या भावावर परवानाधारक बंदुकीतून झाडल्या गोळ्या

वास्को : आपल्या धाकट्या भावावर परवानाधारक बंदुकीतील तीन गोळ्या झाडणाऱ्या सेड्रिक मिनेझिस गामा (५३) याला वेर्णा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उभे केले असता, त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. याप्रकरणी वेर्णा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवार, दि. ३ घडली. याप्रकरणी संशयिताचा धाकटा भाऊ विल्फ्रेड मिनेझिस गामा याने वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार केली. दोघांमध्ये काही कारणास्तव वितुष्ट आल्याने संबंध तणावपूर्ण होते. मंगळवारी सेड्रिक याने विल्फ्रेड याला गंभीर परिणामाची धमकी दिली. त्यानंतर सेड्रिकने आपली परवाना असलेली बंदूक आणून तीन गोळ्या भावावर झाडल्या. त्याच्या या निष्काळजीपणा व अविचारीपणामुळे विल्फ्रेड व त्याच्या कुटुंबातील तसेच परिसरातील इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२), १२५ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५ (९) नुसार गुन्हा नोंद करून सेड्रिक याला अटक केली. पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजदत्त आर्सेकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा