कोविड स्थितीवर लक्ष, घाबरण्याचे कारण नाही : मुख्यमंत्री

राज्यातील कोविड रूग्णांमध्ये वाढ नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th June, 04:53 pm
कोविड स्थितीवर लक्ष, घाबरण्याचे कारण नाही : मुख्यमंत्री

पणजी : राज्यात कोविड १९ रूग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. कोविड स्थितीवर सरकारचे लक्ष असून घाबरण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात कोविडचे रूग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

मास्कचा वापर वा इतर खबरदारीबाबत केंद्राकडून राज्याला कोणतेही नवीन आदेश आलेले नाहीत. यामुळे कोणत्याही प्रकारच्या सतर्कतेबाबतच्या सूचना आरोग्य केंद्रांना देण्यात आलेल्या नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गोव्यात कोविडचे ८ रुग्ण सापडल्याचे दर्शविण्यात आले आहे. आरोग्य संचालकांकडून मात्र याला दुजोरा मिळालेला नाही. कोविडच्या एक रुग्ण गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात सापडला होता. त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली.