जुलैमध्ये मिळणार तिसरीची नवी पुस्तके

ब्रिज अभ्यासक्रमावर शिक्षकांचा भर : मेघना शेटगावकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19 hours ago
जुलैमध्ये मिळणार तिसरीची नवी पुस्तके

पणजी : तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईस उशीर झाल्याने ही पुस्तके जुलै महिन्यात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जून महिन्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘ब्रिज अभ्यासक्रमावर’ भर देण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळाच्या (जीएससीईआरटी) संचालक मेघना शेटगावकर यांनी दिली.
इतर इयत्तांसाठीची पुस्तके मात्र शाळांना पोहोचलेली असून त्यांचे वितरण संबंधित विद्यालयांमार्फत सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या आठवडाभरात सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणानुसार पहिली ते आठवी इयत्तेपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. त्यामुळे या इयत्तांमधील सर्व पुस्तके सरकारकडून मोफत वाटप केली जातात. हे वाटप जीएससीईआरटीच्या माध्यमातून केले जाते. इयत्ता नववी व दहावीच्या पुस्तकांची छपाई शालांत मंडळामार्फत केली जाते. ही पुस्तके बाजारात उपलब्ध असून विद्यार्थ्यांना ती खरेदी करून घ्यावी लागतात.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू झाल्यानंतर तिसरी आणि सहावीसाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे तिसरीच्या नवीन पुस्तकांची छपाई थोडी उशिरा झाली. या पुस्तकांमध्ये गतानुभवाधिष्ठित शिक्षणावर भर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ब्रिज अभ्यासक्रम सक्तीचा करण्यात आला आहे.
जून महिन्यात शिक्षकांनी या ब्रिज अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जीएससीईआरटीमार्फत देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा