पणजी : आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉतील डॉक्टरांना घेतले फैलावर

चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रुद्रेश यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
पणजी : आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉतील डॉक्टरांना घेतले फैलावर

पणजी : बांबोळी येथील गोमेकॉत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज शनिवारी ७ जून रोजी आकस्मिक भेट दिली व कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एका डॉक्टरला कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले. 

सदर डॉक्टर गोमेकॉत उपचारांसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाशी उर्मट पद्धतीने वागल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे आली होती. विविध वार्डांत रुटीन पाहणी केल्यानंतर त्यांनी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रुद्रेश यांना पाचारण केले व त्यांना त्यांच्या वर्तवणुकीबाबत जाब विचारला. यावेळी कोणतेही समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने आरोग्यमंत्र्यांनी सदर डॉक्टरला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.  या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर सध्या तूफान व्हायरल होतोय.  


पहा व्हिडिओ



गोमेकॉतील डॉक्टर्स सर्व रुग्णांची योग्य पद्धतीने देखभाल करतात. मात्र काहींच्या चुकीच्या वागण्यामुळे सर्वांना नाहक त्रास सोसावा लागतो. हे लोक सामान्यांची सेवाही करू शकत नसतील तर अशांना सरकारी सेवेत ठेवण्याचे काहीच कारण राहत नाही. मंत्री म्हणून मला हे पाऊल उचलावे लागले असे पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले.  

आरोग्यमंत्र्यांनी याधीही उपसले आहे निलंबनाचे अस्त्र!

राज्यातील आरोग्य व्यवस्था सुरळीत असावी, लोकांना उत्तम सेवा मिळावी, यासाठी आरोग्यमंत्री राणे प्रयत्नरत आहेत . त्यासाठी विविध यंत्रणांवर लक्ष ठेवून ते आढावा घेतात. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात म्हापसा उपजिल्हा रुग्णालयातील दोन चालक व अन्य एका कर्मचाऱ्याला निलंबित केले होते. तसेच एप्रिलमध्ये देखील कामकाजाची पाहणी करताना उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट डॉ. शर्ली रिबेरो यांना कामावरील निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आले होते. 

यानंतर मे महिन्यात राणे यांनी २ आरोग्य निरीक्षक आणि ४ स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाचा आसूढ उगारला होता. त्यांना भ्रष्टाचार तसेच नागरिकांना ब्लॅकमेल केल्याचा  ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले होते.

हेही वाचा