केरळमध्ये होणार अर्जेंटिना संघाचा थरारक सामना
कोची : फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंमध्ये गणला जाणारा लिओनेल मेस्सी अखेर भारताच्या भूमीत पाऊल ठेवणार आहे, आणि ताेही स्वतःच्या राष्ट्रीय संघासोबत! ही बातमी समजताच फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह उसळला आहे. केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनी शनिवारी या ऐतिहासिक घटनेची अधिकृत घोषणा केली आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.
ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान हा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे. हा कालावधी फीफा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यांच्या अधिकृत वेळापत्रकात येतो. सामना केरळमधील ग्रीनफिल्ड स्टेडियम, त्रिवेंद्रम येथे होण्याची शक्यता आहे. जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम मानले जाते.
क्रीडामंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार फक्त यजमानाची भूमिका बजावेल. अर्जेंटिना संघाला ‘स्टेट गेस्ट’ दर्जा दिला जाणार आहे. सुरक्षा, निवास, वाहतूक आणि व्यवस्था याची जबाबदारी सरकार घेईल. कोणताही आर्थिक खर्च सरकार उचलणार नाही. सर्व निधी आधीच प्रायोजकांनी पूर्णपणे भरला आहे.
“मेस्सी केरळमध्ये येणार, यात आता कोणतीच अडचण उरलेली नाही. प्रायोजकांनी पूर्ण रक्कम भरली आहे. सामना नियोजित वेळेतच होईल. त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर चाहत्यांची जल्लोषात प्रतिक्रिया उमटली आहे. #MessiInIndia हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे!
भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी सुवर्णसंधी
भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी ही संधी म्हणजे एक स्वप्न साकार होण्यासारखी गोष्ट! लिओनेल मेस्सीसारखा दिग्गज खेळाडू देशात खेळणार, हे अभिमानास्पद ठरणार आहे. हा सामना भारतात फुटबॉल संस्कृतीसाठी एक नवा अध्याय ठरू शकतो. भारतातील फुटबॉलच्या वाढत्या लोकप्रियतेसाठीही हा क्षण ऐतिहासिक ठरेल.
तिकीट विक्री आणि अधिक माहिती लवकरच
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन (AFA) आणि आयोजक लवकरच सामन्याची अंतिम तारीख वेळ आणि तिकिट खरेदीसंबंधी माहिती याची अधिकृत घोषणा करणार आहे. या ऐतिहासिक सामन्याच्या तिकिटासाठी प्रचंड मागणी अपेक्षित आहे.
मेस्सी केरळमध्ये: एक स्वप्नवत क्षण
जगभरातील फुटबॉल चाहता ज्या लिओनेल मेस्सीला टीव्हीवर पाहतो, तो भारतातील स्टेडियममध्ये खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे! ही सामन्याची केवळ बातमी नसून, एक उत्सव आहे, भारताच्या फुटबॉलप्रेमींच्या स्वप्नांचा, आणि जागतिक फुटबॉलमध्ये भारताच्या स्वागताचा! "तयार राहा… कारण मेस्सी येतोय!"