केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर यांची चिखलीतील WOOW प्रकल्पाला भेट

महिलांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या ग्रामीण स्वच्छतेच्या उपक्रमांचे कौतुक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर यांची चिखलीतील WOOW प्रकल्पाला भेट

वास्को : ग्रामीण विकासासाठी महिला स्व-सहायता गटांमार्फत राबवले जाणारे स्वच्छतामूलक उपक्रम हे प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर यांनी केले. त्यांनी चिखली येथील WOOW कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देत या प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची पाहणी केली आणि स्वच्छ, हरित व शाश्वत ग्रामीण विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.

या प्रसंगी पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो तसेच स्थानिक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रकल्प पाहणीदरम्यान डॉ. चंद्रशेखर यांनी गाव पातळीवर सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापनातील प्रगतिशील कार्यप्रणालीचे निरीक्षण करत स्थानिक यंत्रणांच्या योगदानाचेही कौतुक केले.

 महिला स्व-सहायता गट हे ग्रामीण विकासाचे खरे बळ असून त्यांच्या माध्यमातून स्वच्छता, रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरण साधले जात आहे, असे न्यू वाडे येथे आयोजित जनसभेत बोलताना डॉ. चंद्रशेखर म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे गावांचा सर्वांगीण विकास शक्य होत असून इतर राज्यांनीही या मॉडेलचा स्वीकार करावा, असे ते म्हणाले.

काय आहे WOOW प्रकल्प

 चिखली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला ‘Wealth Out Of Waste’ (WOOW) प्रकल्प गोव्यातील स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श मॉडेल आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते २ ऑगस्ट २०२३ रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून हा प्रकल्प केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील ग्रामीण स्वच्छता अभियानासाठी एक प्रेरणास्थान ठरला आहे.

चिखलीतील WOOW प्रकल्प ठरतोय स्वच्छतेचा आदर्श मॉडेल

सुमारे ५,००० चौरस मीटर क्षेत्रावर उभारलेल्या या प्रकल्पात दररोज सुमारे ५ टन जैविक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. बायोगॅसच्या साहाय्याने वीजनिर्मिती केली जाते आणि उरलेली सेंद्रिय स्लरी खत म्हणून पुन्हा वापरली जाते. याशिवाय प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी येथे श्रेडर, बेलिंग मशिन, मटेरियल रिसोर्स फॅसिलिटी (एमआरएफ) युनिट, तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट आणि फेकल स्लज ट्रीटमेंट प्लांट कार्यरत आहेत.

कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर व पुनर्प्रक्रियेसाठी येथे ‘WOOW App’ आणि ‘WOOW Heroes’ उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमांतर्गत घराघरांतून कचरा संकलन, ई-कचऱ्याचे व्यवस्थापन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी माहितीपर सहलींचे आयोजन केले जात आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील अनेक महिला स्व-सहायता गटांना रोजगार मिळाल्याने सामाजिक सहभागातही लक्षणीय वाढ झाली आहे.

मागेच चिखली ग्रामपंचायतीने या प्रकल्पातून सामाजिक बांधिलकी जपून काही गृहनिर्माण सोसायट्यांना स्वच्छता नियमांचे पालन केल्याबद्दल सन्मानित केले होते. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देशभरातून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट देऊन त्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी देखील एका सभेत केले होते.

स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण विकास या तीनही अंगांनी प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी झाल्याने चिखलीचा WOOW प्रकल्प संपूर्ण गोव्यासाठी आणि देशासाठी एक आदर्श आहे.