हडफडे ड्रग्ज प्रकरणातून महिलेची निर्दोष मुक्तता

चरस जप्त केल्याचे सिद्ध करण्यास अपयश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th June, 11:20 pm
हडफडे ड्रग्ज प्रकरणातून महिलेची निर्दोष मुक्तता

म्हापसा : हडफडे येथील ड्रग्ज प्रकरणात चरस हा प्रत्यक्षात आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे, हे सिद्ध करण्यास सरकारी पक्षाला अपयश आले आहे, असा निष्कर्ष नोंदवत सुरेखा उर्फ रेखा सुरेश मांद्रेकर (कळंगुट) हिला या ड्रग्ज प्रकरणातून म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दोषमुक्त केले.

गुन्ह्याचा पंचनामा, जप्ती अहवाल आणि प्रतिबंधित पदार्थ असलेल्या लिफाफ्यावर स्वाक्षरी केल्यामुळे आरोपीकडे बेकायदेशीर पदार्थ आढळल्याचा आरोप फिर्यादी पक्षाच्या बाजूने गृहीत धरला जाऊ शकत नाही. गुन्ह्याचा तथ्यात्मक साचा फिर्यादींनी ठेवला असला तरी हा चरस आरोपींकडूनच जप्त करण्यात आला आहे, हे सिद्ध झालेले नाही. तसेच साक्षीदारांच्या साक्षींमध्ये विसंगती असल्याने हा टाकलेला छापा आणि वसुलीबाबत शंका निर्माण होते, असे निरीक्षणही न्यायालयाने या निवाड्यात नोंदवले आहे.

न्यायालयात संशयित पक्षातर्फे अ‍ॅड. पी. नाईक व अ‍ॅड. नम्रता नाईक यांनी तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील आर. डिसोझा यांनी युक्तीवाद केला.

५२ हजारांचा चरस केला होता जप्त

दि. २५ फेब्रुवारी २०११ रोजी हणजूण पोलिसांनी हडफडे येथील परब शॉव मील जवळ छापा टाकून ५१८ ग्रॅम हा ५२ हजारांचा चरस जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या २० (ब)(२)(ब) कलमान्वये गुन्हा नोंदवून सुरेखा उर्फ रेखा मांद्रेकर हिला अटक केली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रविण गावस यांनी याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.