मोबाइल फोन आणि ९ हजार रोख हस्तगत
पणजी : भाटले येथील फर्नांडिस बेकरीजवळील एका घरात घुसून मोबाइल आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला पणजी पोलिसांनी अटक केली असून, चोरी झालेला सगळा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असणारे तोप बहादूर के.सी. (मुळ नेपाळ) यांनी ६ जून रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, ४ जूनच्या रात्री ११ ते ५ जूनच्या पहाटे ५.३० दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खोलीतून १० हजार रुपयांचा मोबाईल आणि ९ हजार रोख असा सुमारे १९ हजारांचा ऐवज चोरला होता.
पणजी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चंद्रकांत कृष्णा केनावडेकर (वय ६५, चिंबल) याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाइल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. केनवडेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जुने गोवे पोलीस स्थानकात गुन्हे नोंद आहेत.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि पणजीचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पणजीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने या प्रकरणी कारवाई केली.