चार वर्षांपासून विकासकामांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक संतप्त
कामराळ येथील रस्त्याची झालेली अवस्था.
केपे : कुडचडे काकोडा पालिकेच्या प्रभाग दोनमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, या प्रभागाचे नगरसेवक प्रसन्ना भेंडे यांनी नगराध्यक्ष पदाचा ताबा घेऊनसुद्धा प्रभागाच्या विकासकामांकडे ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
स्थानिक नागरिक विनोद नाईक यांनी सांगितले की, कुडचडे मतदारसंघात भूमिगत वीज वाहिनीसाठी सर्व प्रभागांतील रस्ते गेल्या चार वर्षांपासून खोदून ठेवले आहेत. त्यात प्रभाग दोनचाही समावेश आहे. या प्रभागातील भूमिगत वीज वाहिनीचे काम संपून अनेक महिने उलटले असले तरी, खोदून ठेवलेल्या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण केले जात नाही. प्रसन्ना भेंडे नगरसेवक म्हणून निवडून आल्यास आता चार वर्षे होत आली आहेत, पण त्यांनी आपल्या कारकिर्दीत या प्रभागातील मुख्यतः कामराळ, देवलेमळ, अस्तेमळ भागात एकही काम केले नाही, असे नाईक यांनी नमूद केले.
आठ वर्षांपूर्वी माजी नगरसेवक फेलिक्स फर्नांडिस यांनी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले होते, पण आता भूमिगत वीज वाहिनीमुळे रस्ता खराब झाला असून डांबरीकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष भेंडे यांनी प्रभागातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
रेल्वे अंडरपासची समस्या कायम
कामराळ येथे गोवा मुक्तीपूर्वी असलेल्या रेल्वे अंडरपासचे फक्त रुंदीकरण करण्यात आले आहे, मात्र त्याची उंची तशीच ठेवल्यामुळे रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या गावातील लोकांना आजही पूर्वीसारखाच त्रास सहन करावा लागतो, असे नाईक यांनी सांगितले. रुग्णांना आणण्यासाठी रुग्णवाहिका तसेच इतर कामांसाठी लोकांना बरेच त्रास सोसावे लागतात. आमच्या गावात अनेक समस्या असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.