‘टॅक्सी अॅग्रिगेटर’ला चालकांचा विरोध, अपघातांच्या घटनांत वाढ
पणजी : राज्यात ‘टॅक्सी अॅग्रिगेटर’ नकोच, अशी भूमिका स्थानिक टॅक्सी चालकांनी कायम ठेवली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत संबंधित आमदारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणू, असा इशाराही त्यांनी दिला. बस्तोडा येथे गरोदर पत्नीसह पतीला मारहाण, हरमल येथे मच्छिमाराला मारहाण याशिवाय अपघाताच्या अनेक घटना या आठवड्यात घडल्या असून या घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
उसगाव-गांजे नदीत दोघे बुडाले
उसगाव-गांजे येथील नदीवर जलक्रीडा करण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. तर, अन्य दोन युवकांना अग्निशमन दलाने सुखरूप वाचवले. बुडालेल्या दोन युवकांपैकी लवप्रीत सिंग याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे, तर धनंजय खैरनार याचा शोध घेण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
समग्र शिक्षा अभियानातील अफरातफर प्रकरणी तिघे ताब्यात
‘समग्र शिक्षा अभियान’च्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून ५ कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांना आणखी तिघा संशयितांना अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून ते सर्व मूळचे पश्चिम बंगालचे आहेत.
सोमवार
अॅप अग्रिगेटरविरोधात स्थानिक टॅक्सी मालकांचा ‘एल्गार’
राज्यात अॅपवर आधारित टॅक्सी सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक खात्याने जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेला विरोध करीत स्थानिक टॅक्सी मालकांनी पुन्हा एकदा ‘एल्गार’ पुकारला. राज्यात ‘टॅक्सी अॅग्रिगेटर’ नकोच, अशी भूमिका स्थानिक टॅक्सी चालकांनी कायम ठेवली आहे.
पिळर्ण येथील अपघातात आई, मुलगा जखमी
पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीच्या फाटकासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये नेरुळचे रहिवासी रोहन कळंगुटकर (२९) आणि त्यांची आई निता कळंगुटकर (५४) यांचा समावेश असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
मंगळवार
स्थानिक टॅक्सी मालकांच्या आमदारांना धमक्या!
राज्य सरकारच्या नियोजित कॅब अॅग्रिगेटर धोरणाला विरोध करीत असलेल्या स्थानिक टॅक्सी मालकांनी आता किनारी भागांतील आमदारांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. आमची मागणी मान्य न केल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत संबंधित आमदारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणू, असा इशाराही त्यांनी दिला.
बस्तोडा येथे गरोदर पत्नीसह पतीला मारहाण
बस्तोडा येथे रोडरेजवरून झालेल्या वादातून गरोदर पत्नीसह पतीला जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी २० ते २५ जणांच्या अज्ञात टोळक्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलीस, वीज कर्मचारी व वकील यांचा या घटनेत समावेश असल्याचा दावा पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कोरगाव नागरिकांची पेडणे पोलीस स्थानकावर धडक
चंद्रशेखर शेट्ये यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले व अपघात करून पसार झालेल्या संशयिताला जास्तीत जास्त शिक्षा पेडणे पोलिसांनी देण्याची मागणी पेठेचावाडा कोरगाव येथील नागरिकांनी करीत पेडणे पोलीस स्थानकावर धडक दिली.
बुधवार
वन हक्क कायद्यांतर्गत सनदीसाठींचे अर्ज निकालात काढण्याची घोषणा
वन हक्क कायद्यांतर्गत सनदीसाठींचे सर्व अर्ज १९ डिसेंबर २०२५ पर्यंत निकालात काढण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. स्थानिक समित्या व ग्रामसभांना उशीर होत असल्याने अर्ज निकालात काढण्यास विलंब होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
रोहन हरमलकरला ईडीकडून अटक
जमिनी हडप केल्याप्रकरणी संशयित व्यावसायिक रोहन हरमलकर याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत अटक केली आहे. म्हापसा येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयाने त्याला १४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. हरमलकर यांनी २०२२ मध्ये कुंभारजुवे मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
गुरुवार
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोव्यात
गोव्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात दाखल झाले. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती दामू नाईक यांनी दिली आहे.
शुक्रवार
दाबामळ सांगेत देवमाशाची दहा कोटींची उलटी जप्त
दाबामळ कोटार्ली सांगे येथे देवाणघेवाण सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकून सांगे पोलिसांनी ५.७५ किलो वजनाची, सुमारे दहा कोटी रुपये किमतीची देवमाशाची उलटी जप्त केली. ही उलटी घेऊन आलेली कारही जप्त करण्यात आली.
ईडब्ल्यूएस घटकांसाठी लवकरच गृह योजना : मुख्यमंत्र्यांची घोषणा
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) व्यक्तींना पक्के घर बांधण्यासाठी तसेच घराच्या दुरुस्तीसाठी सरकार लवकरच नवीन योजना आणणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. पणजीत पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्यांनी माहिती दिली.
शनिवार
गोमेकॉत डॉक्टरचे निलंबन करण्याचे आदेश
बांबोळी येथील गोमेकॉत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आकस्मिक भेट देत कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एका डॉक्टरला कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन सेवेतून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले. सदर डॉक्टर गोमेकॉत उपचारांसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाशी उर्मट पद्धतीने वागल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे आली होती.
वॉव कचरा प्रक्रिया प्रकल्पाला केंद्रीय राज्यमंत्र्यांची भेट
केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर यांनी चिखली येथील वॉव कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देत या प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची पाहणी केली. स्वच्छ, हरित व शाश्वत ग्रामीण विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
लक्षवेधी
भाटले येथील फर्नांडिस बेकरीजवळील एका घरात घुसून मोबाइल आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला पणजी पोलिसांनी अटक केली असून, चोरी झालेला सगळा माल हस्तगत करण्यात आला आहे.
आसगाव येथील एका इलेक्ट्रिक गोदाममध्ये जेवण बनवताना आग लागली. आग विझवण्यासाठी मालकाच्या मदतीला धावून आलेला चंद्रशेखर चव्हाण (३५, रा. मूळ महाराष्ट्र) याच्यासह गोदाम मालक तैमीर (रा. मूळ ओडिशा) हे जखमी झाले. या आगीमुळे गोदामातील सुमारे ३० हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले.
कळंगुट येथील तिवायवाडा भागातील एका खासगी व्हीलामधील जलतरण तलावात बुडून अब्दूल सलीम समद (वय ३९, मूळ रा. कोप्पाल, कर्नाटक) या युवकाचा मृत्यू झाला. अब्दूल सलीम हा कळंगुट येथील बेला रेसीडेन्सी हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या इस्रायली नागरिक डेव्हिड डिहम ऊर्फ डुडू याला अटकेची माहिती लेखी स्वरूपात दिली नसल्यामुळे न्यायालयाने त्याची तत्काळ सुटका केली. केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने डुडूला हणजूण परिसरातून अटक केली होती. याबाबतचा आदेश म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्या. नीलिमा काणकोणकर यांनी दिला.
म्हापसा येथील आराम सोडा तथा जुन्या आंतरराज्य बस स्थानकाच्या आवारातील मोकळी जागा अडवलेल्या ‘रेन्ट अ बाईक’ व कार संबंधित व्यावसायिकांनी हटवल्या आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशानंतर वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी पार्क केलेली व्यावसायिक सर्व वाहने तत्काळ हटवावीत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिली होती.
हरमल समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक मच्छिमाराला सहा पर्यटकांनी मारहाण केली. एका होडीची जागा बदलण्यावरून सुरू झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यवसान शिवीगाळ व मारहाणीत झाले. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी महाराष्ट्रातील सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला. यापैकी दोघांना घटनास्थळीच तर उर्वरित चार जणांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे.