राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज खेळाडूंचा सहभाग
पत्रकार परिषदेत माहिती देताना चैतन्य तारकर, अध्यक्ष निरज कन्नूर, सचिव अवधूत कुवेलकर आणि गोव्यातील टेनिसपटू नोएल नरोन्हा.
पणजी : पणजीतील इनडोअर स्टेडियम, कांपाल येथे १४ आणि १५ जून रोजी होणाऱ्या बहुराज्यीय व्हेटरन्स टेबल टेनिस संघ स्पर्धेचे नेतृत्व देशातील आघाडीचे राष्ट्रीय खेळाडू करणार आहेत. पणजी मॉर्निंग स्टार्स स्पोर्ट्स क्लब (पीएमएसएसआय) यांच्यावतीने आयोजित या दोन दिवसांच्या स्पर्धेत भारतातील चार राज्यांतील आघाडीचे अनुभवी खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी असोसिएशनचे संचालक चैतन्य तारकर, अध्यक्ष निरज कन्नूर, सचिव अवधूत कुवेलकर आणि गोव्यातील टेनिसपटू नोएल नरोन्हा उपस्थित होते.
महाराष्ट्राकडून ५९+ गटातील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते जयंत कुलकर्णी, सध्याचे महाराष्ट्र क्रमांक १ खेळाडू सुहास राणे, ३९+ महिला राष्ट्रीय विजेती व आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ हून अधिक पदकविजेती मून मून मुखर्जी, तसेच ३९+ राष्ट्रीय विजेता मनीष रावत सहभागी होणार आहेत. त्यांच्याशिवाय अत्माराम गंगर्डे आणि दीपेश अभ्यंकर यांसारखे राष्ट्रीय मानांकनातील खेळाडूही असतील.
कर्नाटककडून ३९+ रौप्यपदक विजेते आणि सिंगापूर व्हेटरन्स ओपन चॅम्पियन रामकुमार यू.एन., तसेच क्षितिज मल्होत्रा, शिवकुमार आणि संदीप एस.एस. हे मान्यवर खेळाडू स्पर्धेत उतरतील. मध्यप्रदेशकडून किशोर मोटवानी आणि विशाल जैन हे राष्ट्रीय मानांकनातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
गोवाकडून माजी राज्य विजेते नोएल नोरोन्हा यांच्यासह अरुण नाईक, अमित नाईक, दीपक गोपानी, सतीश अग्रहार आणि नीरज कन्नुरे यांचा सहभाग असेल.
एकूण १६ संघांचा सहभाग
या स्पर्धेत एकूण १६ संघ असतील. प्रत्येक संघात ३९+, ४९+, ५९+ वयोगटांतील प्रत्येकी दोन खेळाडू (पुरुष व महिला) सहभागी असतील. स्पर्धेचे उद्घाटन १४ जून रोजी सकाळी १० वाजता तर समारोप समारंभ १५ जून संध्याकाळी ६ वाजता होईल. ग्रँड गाला डिनरही या कार्यक्रमाचा भाग असणार आहे. मार्गो येथील दीपक चोडणकर हे राष्ट्रीय दर्जाचे पंच मुख्य पंच म्हणून काम पाहणार आहेत.