सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून महिलेला ४ लाखांचा गंडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th June, 12:29 am
सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून महिलेला ४ लाखांचा गंडा

वास्को : सीबीआय अधिकारी व एमआयडीसी पोलीस असल्याचे सांगून मोबाईल क्रमांक व वॉट्सअ‍ॅपद्वारा चार लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याची तक्रार मूळची गुजरात परंतु सध्या वेर्णा येथे राहणाऱ्या एका महिलेले वेर्णा पोलीस स्थानकात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना ३० डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. एका अनोळखी व्यक्तीने संबंधित महिलेकडे तिच्या मोबाईल व वॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्या व्यक्तीने स्वतःला एमआयडीसी पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने संबंधित महिलेला तिचा आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक हा अपहरण, मानवी तस्करी, मनी लाँड्रिंग यासारख्या बेकायदेशीर कामांसाठी वापरण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आल्याचे सांगितले.

यानंतर दुसऱ्या व्यक्तीने त्या महिलेशी पुन्हा वॉट्सअ‍ॅपद्वारा संपर्क साधला. त्या व्यक्तीने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून आपले ओळखपत्र दाखविले. त्यानंतर त्या व्यक्तीने सदर महिलेला अटक वॉरंट पाठविले. यानंतर त्या व्यक्तीने त्या महिलेला या प्रकरणून बाहेर पडण्यासाठी व निर्दोष दाखविण्यासाठी काही रकमेची मागणी केली. ही रक्कम दिली नाही, तर अटक करण्यात येईल अशी धमकी दिली. या धमकीमुळे सदर महिला व तिची अल्पवयीन मुलगी घाबरली. भीतीमुळे त्या महिलेने युपीआय व बँक ट्रान्सफरद्वारे ४ लाख ४ हजार ९९८ रुपये त्यांच्या खात्यात वळते केले. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्या महिलेने पोलीस तक्रार केली. पोलिसांनी ३१८(४), ३१९(२)आर/डब्ल्यू ३(५) तसेच आयटी कायदा कलम ६६ खाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा