न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्यातील राजकीय वाद मस्क यांना चांगलाच महागात पडला आहे. या वादामुळे टेस्लाच्या समभागांमध्ये जोरदार घसरण झाली असून, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत कंपनीचे ३८० अब्ज डॉलर्स (सुमारे ३२ लाख कोटी रुपये) इतके बाजारमूल्य कमी झाले आहे. ही आजवरच्या बाजारातील सर्वांत मोठ्या तोट्यांपैकी एक मानली जात आहे.
नेमके काय प्रकरण ?
एलन मस्क यांनी ट्रम्प सरकारच्या ‘न्यू टॅक्स अँड स्पेंडिंग बिल २०२५’वर सोशल मीडियावर तीव्र टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी टेस्ला व स्पेसएक्स या मस्कच्या कंपन्यांना दिलेले सरकारी करार रद्द करण्याचा इशारा दिला. त्यानंतर टेस्लाचे शेअर्स सतत घसरू लागले.
इतर कारणांनीही दबाव
ट्रम्प-विरोधाशिवाय टेस्लाला इतर अडचणींनाही तोंड द्यावे लागत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी कमी होत आहे, उत्पादनात अडचणी येत आहेत, त्यामुळेही टेस्लाचे शेअर्स दबावात आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, फक्त एका दिवसात कंपनीचे १५० अब्ज डॉलर्स इतके नुकसान झाले असून, ही टेस्लाच्या इतिहासातील सर्वांत मोठी घसरण ठरली आहे.
समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न, पण ट्रम्प नाराज
व्हाइट हाऊसकडून मस्क आणि ट्रम्प यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र ट्रम्प यांनी याला साफ नकार दिला असून, 'जो व्यक्ती वारंवार मानसिक संतुलन गमावतो, त्याच्याशी संवाद साधण्यात मला रस नाही,' अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.