प्रेमसंबंध, लिव्ह इन अन् हत्या; प्रेयसीचा तडफडून मृत्यू

वाचा, कोल्हापूरमधील समीक्षा नरसिंगे हत्या प्रकरणाचा थरार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
05th June, 05:42 pm
प्रेमसंबंध, लिव्ह इन अन् हत्या; प्रेयसीचा तडफडून मृत्यू

कोल्हापूर : मागील काही वर्षांपासून युवा वर्गात लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड वाढत असून दुर्दैवाने या प्रकारातून गुन्हेगार तयार होऊ लागल्याच्या घटना उघड होत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरात झालेले समीक्षा नरसिंगे (वय २३) हत्या प्रकरण देखील याच मार्गाने पुढे सरकलेले तपासाअंती समोर आले आहे. सतीश यादव (वय २५) आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३) हे गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहणारे जोडपे. मात्र अलिकडेच त्यांच्यात लग्नावरून सुरू झालेला वाद आणि वादातून सतीशने समीक्षाचा चाकूने भासकून केलेला खून हा महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाला लागलेला डाग म्हणावा लागेल.

याप्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की, समीक्षा कोल्हापुरातील कसबाबावडा येथे आई, बहीण आणि भावासोबत राहत होती. २०१८ मध्ये तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर तीन महिन्यातच नवऱ्याच्या त्रासामुळे तिने सासर सोडले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने समीक्षा उदरनिर्वाहासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होती.


या इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामातून सतीश आणि समीक्षाची ओळख झाली. त्यातून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर हे दोघे मागील सहा महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहत होते. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडत होते.

सतीश लग्नासाठी समीक्षाकडे आग्रह करत होता. मात्र, सतीशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे समीक्षाने लग्नाला नकार दिला होता. समीक्षाने सतीश सोबतचे नाते तोडल्यानंतर ती काही दिवस मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात आणि नंतर तिथून आपल्या आईच्या घरी राहण्यास गेली होती. आठवडाभरापासून सतीश वारंवार फोन करून समीक्षाला भेटायचं असल्याचं सांगत होता. मात्र समीक्षा भेटणं टाळत होती.

सरनोबतवाडीतील रूमवर घडला प्रकार
मंगळवारी समीक्षा मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील घरी सामान आणण्यासाठी गेली होती. तेव्हा सतीशने तिला फोन केला. समीक्षा सरनोबतवाडीत आल्याचे कळताच १५ मिनिटांत सतीश तेथे पोहोचला. यानंतर दोघांमध्ये लग्नावरुन पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. मैत्रिणीने दोघांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या सतीशने त्याच्याकडे असलेला चाकू समीक्षाच्या छातीत खुपसला.


दरवाजा बंद केल्याने दोघीही आत अडकल्या
सतीशने चाकू इतक्या जोरात खुपसला की, तो थेट बरगड्यांपर्यंत पोहोचला. छातीत खोलवर जखम झाल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली. तशा अवस्थेत समीक्षाला लाथा मारून सतीश हॉलचे दार बाहेरून बंद करून निघून गेला. दरवाजाला बाहेरून कडी लावल्याने समीक्षाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. दरम्यान तिच्या मैत्रिणीने एका मित्राला फोन करून बोलावले. त्याने रूमचा दरवाजा उघडला. त्यानंतर तातडीने समीक्षाला खाजगी वाहनातून प्रथम राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात व नंतर सीपीआरमध्ये  दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

क्लब चालवत असल्याने लग्नाला नकार
सतीश यादव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, तो शिवाजी पेठेत क्लब चालवत होता. त्याला दुसरे काहीतरी काम कर, असा सल्ला समीक्षाने दिला होता. परंतु, तो ऐकत नसल्याने तिने लग्नास नकार दिला. याच वादातून तिचा बळी गेल्याची माहिती करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजीत क्षीरसागर यांच्या कडून देण्यात आली आहे. 

गळफास घेत सतीशची आत्महत्या
याप्रकरणानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या सतीश यादव याने पन्हाळा तालुक्यातील आपल्या मूळ गावी जाऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी सतीशचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.

हेही वाचा