कराची पोलीस अधीक्षकांकडून महामार्ग, गावे सील
कराची: सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानातील कराची येथील मालीर जिल्हा कारागृहातून एकूण २१६ कैद्यांच्या पलायनाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार शहरात रात्री भूकंपाचे धक्के बसले. यावेळी सुरक्षेसाठी कैद्यांना त्यांच्या बराकीतून बाहेर काढून मुख्य गेटपर्यंत नेलं होतं. याचाच फायदा घेत किमान २१६ कैदी पळून गेले. दरम्यान तुरुंग अधीक्षकांनीच २१६ कैदी पळून गेले असल्याची माहिती दिलीय. ८० पेक्षा अधिक कैद्यांना पुन्हा पकडण्यात आलं असून अजूनही काही कैदी फरार असल्याचे तुरुंग अधीक्षकांनी सांगितलं आहे.
महामार्ग आणि गावे सील
भूकंपाच्या धक्क्यानंतर कारागृहाच्या आवारात आणि आजूबाजूला जोरदार गोळीबार झाल्याची प्राथमिक माहितीही मिळाली आहे. गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली असून पोलीस आणि रेंजर्सनी परिसराला वेढा घातल्याने राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले होते. एसएसपी मालीर काशिफ आफताब अब्बासी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "पोलीस आणि निमलष्करी दलाने काही वेळातच तुरुंगालगतच्या परिसरासह जवळच्या वस्त्या, महामार्ग आणि गावे सील केली होती.
तुरुंग अधिकाऱ्यांकडून गोळीबार
या प्रकारानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात, तुरुंग अधिकाऱ्यांनी गोळीबार केला होता. त्या चकमकीदरम्यान, फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) च्या दोन कर्मचाऱ्यांसह किमान पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. तसेच एका कैद्याचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिनाह ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या सोशल मीडियावर या घटनेचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात कैदी पळून गेल्यानंतर हवेत गोळीबार केला जात असल्याचेही दिसत आहे. मालिर तुरुंगाच्या परिसरातील हे व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत असून इतर व्हिडीओमध्ये कैदी रस्त्यावरून पळताना दिसत आहेत.