अटकेची लेखी माहिती न दिल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
पणजी : कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या इस्रायली नागरिक डेव्हिड ड्रिहम ऊर्फ डुडू याला अटकेची माहिती लेखी स्वरूपात दिली नसल्यामुळे न्यायालयाने त्याची तत्काळ सुटका केली. केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने डुडूला मंगळवारी हणजूण परिसरातून अटक केली होती. याबाबतचा आदेश म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्या. नीलिमा काणकोणकर यांनी दिला.
इस्रायली नागरिक डुडू ड्रग्ज तस्करीत सक्रिय झाल्याची माहिती गुप्तहेरांकडून एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, एनसीबीचे उपसंचालक नितीन गवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक फ्रान्सिको झेवियर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मंगळवारी हणजूण परिसरात कारवाई करून डुडूला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडून पथकाने ११ ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी डुडूला एनसीबीच्या कोठडीसाठी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी डुडूतर्फे न्यायालयात अॅड. राजू पोवळेकर यांनी डुडूला अटकेची माहिती लेखी स्वरूपात दिली नाही. त्यामुळे अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करून युक्तिवाद मांडला. यावेळी अॅड. पोवळेकर यांना अॅड. साहील लवंदे यांनी साथ दिली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून डुडूला तत्काळ सुटका करण्याचा आदेश जारी केला.
दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्त
२१ फेब्रुवारी २०१० रोजी हणजूण येथे छापा टाकून एएनसीने डुडूला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून २ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केल्याचे नमूद केले होते.
या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपपत्रही दाखल झाले होते. मात्र, न्यायालयाने डुडूला निर्दोष मुक्त केले असून, उलट एएनसीच्या पथकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या अटकेनंतर राज्यात मोठी खळबळ माजली होती, ज्यात पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांच्या नातेवाईकांवरही आरोप झाले होते.
याशिवाय, २०१९ मध्ये हणजूण समुद्रकिनारी जेटस्की कामगारांवर सुरी हल्ला केल्याप्रकरणीही डुडूला पुराव्याअभावी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.