आणखी एक वैष्णवी! पैशांसाठी अतोनात छळ, विवाहितेने आयुष्य संपवलं

बीडमधील घटनेने महाराष्ट्रात संताप; पती, नणंद, सासू- सासऱ्यांसह मित्र अटकेत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
06th June, 11:25 am
आणखी एक वैष्णवी! पैशांसाठी अतोनात छळ, विवाहितेने आयुष्य संपवलं

बीडः पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण देशभर गाजत असताना आता बीडमध्ये देखील सासरच्या त्रासाला कंटाळून शुभांगी शिंदे या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी दिलेल्या त्रासातून अंबाजोगाईच्या गीत्ता या गावातील शुभांगीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई व धारूर येथे संतोष शिंदे यांची दोन ऑप्टीकल्सची दुकाने आहेत. असे असूनही तिसऱ्या दुकानासाठी 'तुझ्या माहेरहून चार लाख रुपये आण', असे म्हणून पती, सासू-सासरे नणंद व पतीचा मित्र यांच्याकडून शुभांगीचा छळ सुरू होता. सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर शुभांगीने बुधवारी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आपले जीवन संपवले.


पाच लाख देऊनही आणखी चार लाखांची मागणी
शुभांगीच्या सासरच्यांना लग्नात माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू होता असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच याच कारणावरून तिला अपमानास्पद वागणूक दिली जात होती. सासरच्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून शुभांगीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.


पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी शुभांगीचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात शुभांगीचा भाऊ प्रदीप सोळंके याने पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे, नणंद सीमा शिंदे व पतीचे मित्र संदीप काचगुंडे यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शुभांगी शिंदेंचा मृतदेहाचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पार्थिवावर गिता येथे काल (गुरूवारी) रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या प्रकरणानंतर महाराष्ट्रात पुन्हा संतापाची लाट पसरली आहे. 

हेही वाचा