एसीबीने चौकशीसाठी बजावले समन्स
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये वर्गखोली आणि इमारतींच्या बांधकामात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आम आदमी पक्षाचे दोन माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीबी) या प्रकरणात दोघांनाही समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. सत्येंद्र जैन यांना ६ जून रोजी, तर मनीष सिसोदिया यांना ९ जून रोजी एसीबी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
काय आहे नेमके प्रकरण :
हा प्रकार दिल्लीतील शाळा बांधकाम घोटाळ्याशी संबंधित असून सुमारे २,००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. एसीबीच्या तपासात उघड झाले आहे की, या कामांमध्ये खर्च मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून दर्जाहीन साहित्य वापरले गेले. काही ठिकाणी बांधकाम प्रत्यक्षात झाले नसतानाही त्याचे पैसे कंत्रातदारांना दिले गेले. याशिवाय काही शाळांमध्ये शौचालयांना वर्गखोली म्हणून दाखवून त्यासाठी अधिक पैसे घेतल्याचेही एसीबीने नमूद केले आहे.
या प्रकरणात निवडण्यात आलेल्या ३४ कंत्राटदारांपैकी अनेकांचा संबंध एका विशिष्ट राजकीय पक्षाशी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.कंत्राटदारांशी संगनमत करून निकृष्ट कामे करण्यात आली असून यामुळे सरकारी तिजोरीला मोठा फटका बसला आहे. एवढेच नाही तर या गुणवत्तेच्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे एनसीबीच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे
.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच इतर संबंधित अधिकाऱ्यांचीही एसीबी चौकशी करणार आहे. दरम्यान, या कारवाईनंतर विरोधी पक्षांनी आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले असून सार्वजनिक पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे.