'ओअरफिश' सारखे मासे जेव्हा किनाऱ्यालगत येतात तेव्हा नैसर्गिक आपत्ती उद्भवते, असा दावा करण्यात येतोय

पणजीः प्रचंड उष्णतेच्या लाटा, मुसळधार पाऊस, प्राणघातक पूर, विनाशकारी चक्रीवादळे यासह विविध रोगांच्या साथी, आजार, विषाणूंचा फैलाव या आणि इतर अनेक आपत्तींनी जग धास्तावलं असताना आता आणखी काही संकट उभं राहणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जगात उलथापालथ होईल आणि जग एका मोठ्या संकटात सापडेल की काय असं संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे भारताच्या किनाऱ्यावर सापडलेला 'ओअरफिश' अर्थात 'डूम्सडे फिश'.

प्रलयकारी मासा म्हणून ओळखला जाणारा हा मासा नुकताच तामिळनाडूच्या मच्छिमारांच्या जाळ्यात सापडला आहे. या घटनेने समुद्रकिनारी भागांसह सध्या देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. माशाची ही प्रजाती सामान्यतः खोल समुद्रातील २०० ते १००० मीटरवर आढळत असून क्वचितच किनाऱ्याच्या सानिध्यात येते. मात्र हे मासे जेव्हा किनाऱ्यालगत येतात तेव्हा नैसर्गिक आपत्ती उद्भवते हे इतिहासातील काही घटनांवरून सिद्ध झालं आहे. साधारण चंदेरी रंगाचा आणि एखाद्या फितीसारखा दिसणारा हा मासा जास्तीच जास्त ३० फूट लांबीचा असतो आणि त्याच्यावर लाल रंगाचा पिसाराही असतो.
ओअरफिश आणि नैसर्गिक आपत्तीचे संकेत
ओअरफिश किंवा डूम्सडे फिश हा मासा नैसर्गिक आपत्तीचे आणि विध्वंसाचे संकेत देतो. जपान आणि फिलिपिन्समधील मान्यतांनुसार समुद्राच्या पृष्ठावर हा मासा दिसताच हे भूकंप किंवा त्सुनामीचे संकेत गृहित धरले जातात. जपानी लोककथांमध्ये या माशाला ‘Ryugu no Sukai’ असंही संबोधलं जातं.

भूकंप आणि त्सुनामीच्या घटना
मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास हा मासा आणि आपत्तीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध दिसून आला. २०११ ला जपानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंप आणि त्सुनामीपूर्वी २० ओअरफिश आढळले होते. २०१७ मध्ये फिलिपिन्समध्ये आलेल्या भूकंपाआधीसुद्धा हा मासा दिसला होता. तर, मेक्सिकोमध्येही हा मासा दिसल्यानंतर एक मोठा भूकंप आला होता.
काही संशोधकांच्या मते चिंतेचं कारण नाही
असे असले तरी काही संशोधकांच्या मते, हा मासा आजारी असल्यास, सागरी तळाच्या तापमानाची वाढ झाल्यास किंवा इतर हवामान बदलांमुळे सागरी पृष्ठावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा नैसर्गिक आपत्तीशी काहीही संबंध नाही.

मानवाचा हस्तक्षेपही कारणीभूत
तामिळनाडूतील ही घटना केवळ ओअरफिश किनाऱ्यावरील आगमनावरच थांबली आहे असं नाही. तर मानवाचा सागरी परिसंस्थेवरचा वाढता हस्तक्षेपही याला कारणीभूत ठरतं असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. प्लास्टिक प्रदूषण आणि हवामान बदल यासारखे घटक खोल समुद्रातील प्राण्यांवर परिणाम करत आहेत, त्यामुळे ओअरफिशसारख्या प्रजातींसाठी समुद्राचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.

महासागरः एक गूढ रहस्य
महासागर आणि त्यातील असंख्य जलजीवसृष्टी हे मानवासाठी कायमच एक गूढ बनून राहिले आहेत. त्यात दडलेली अनेक रहस्ये वैज्ञानिकांना अचंबित करतात. महासागराचा खोल भाग, त्यातील कायमस्वरूपी अंधार, अत्यंत कमी तापमान अशा कठोर परिस्थितीतही अनेक विचित्र आणि अद्भुत जीवसृष्टी अस्तित्वात आहे. साधारणतः २०२३ पर्यंत, २४२,००० हून अधिक सागरी प्रजातींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते किमान दोन दशलक्ष सागरी प्रजातींचे दस्तऐवजीकरण अद्याप बाकी आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी सरासरी २,३३२ नवीन प्रजातींचे वर्णन केले जात आहे.