कांदिवली येथील घटना. संतप्त नागरिकांचा रस्त्यावर एल्गार; पीडितेच्या उपचारात दिरंगाईने आमदार आक्रमक

मुंबई: मुंबईतील कांदिवली पश्चिम, लालजी पाडा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने केवळ पाच वर्षांच्या निरागस चिमुरडीला लक्ष्य करून तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केल्यामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही चिमुरडी आपल्या घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने तिला गोड बोलून आपल्या घरात बोलावले. विश्वासाने घरात गेलेल्या त्या चिमुरडीवर त्याने पाशवी अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आला तेव्हा चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टमधून अविरत रक्तस्राव होत असल्याने हादरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
'नशे'ची गोळी खाल्ल्याची कबुली
या घृणास्पद घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवली आणि आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने दिलेले स्पष्टीकरण अधिकच धक्कादायक आहे. त्याने एका व्हिडिओमध्ये कबुली दिली आहे की, त्याने एका 'गोळीचे' सेवन केले होते, ज्यामुळे त्याला नशा चढली आणि तो काय करत आहे याचे त्याला भान राहिले नाही. पोलीस त्याच्या या दाव्याची कसून तपासणी करत आहेत.
स्थानिकांचा आक्रमक पवित्रा:
या संतापजनक घटनेमुळे लालजी पाडा परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे. संतप्त नागरिक आणि स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आरोपीला 'फाशीची शिक्षा' देण्याची मागणी केली आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा झाल्यासच भविष्यात कोणाची अशी हिंमत होणार नाही, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
विधिमंडळातही पडसाद:
कांदिवली येथील या घटनेचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. आमदार योगेश सागर यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सभागृहात सांगितले की, अत्याचार झालेल्या मुलीवर तीन ते चार तास उपचार करण्यात आले नाहीत. मेडिको लीगल केसच्या नावाखाली चिमुरडीला उपचारासाठी तीन तास वाट पाहावी लागली. यावर कायदा बदलण्याची गरज असल्याचे नमूद करत, या प्रकरणी निष्काळजी दाखवणाऱ्या डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी योगेश सागर यांनी केली आहे.