व्हिजन हॉस्पीटलची रूग्णवाहिका पळवली : म्हापसा पोलिसांकडून गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
13th December 2025, 03:46 pm
व्हिजन हॉस्पीटलची रूग्णवाहिका पळवली : म्हापसा पोलिसांकडून गुन्हा नोंद

म्हापसा : गोव्यातील (Goa) धुळेर येथील मेसर्स शेटये व्हिजन हॉस्पीटलची (Hospital) रूग्णवाहिका (Ambulance) चोरून नेल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police) प्रदीप देवू खलप (रा. पीर्ण बार्देश) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी हा सध्या मानसिक रूग्णालयात उपचार घेत आहे.

 ही चोरीची घटना गुरूवार दि. 11 रोजी सकाळी 5.50 वाजता घडली. या चोरलेल्या रूग्णवाहिकेची किंमत 10 लाख रूपये आहे. याप्रकरणी हॉस्पीटलचे प्रशासक इंतेखालो अब्बास शेख यांनी पोलिसांत तक्रार केली. 

 हॉस्पीटल इमारतीच्या तळमजल्यावर जीए 03 एएच 4250 क्रमांकाची मारूती इको रूग्णवाहिका पार्क केली होती. ही रूग्णवाहिका संशयित आरोपीने सुरू केली व ती घेऊन त्याने पळ काढला. संशयित हा रूग्णवाहिका घेऊन थेट बांबोळी येथे मनोरूग्णालयात गेला. नंतर तिथून पुन्हा तो ही रूग्णवाहिका घेऊन पिर्ण येथे घरी जात होता. त्यावेळी रेवोडा येथे म्हापसा पोलिसांनी ही रूग्णवाहिका अडवली व संशयिताला ताब्यात घेतले.

  नंतर पोलिसांच्या चौकशीत संशयित खलप हा मानसिक रूग्ण असल्याचे आढळून आले. भा.न्या.संहितेच्या 305(अ) कलमान्वये पोलिसांनी या चोरी प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास म्हापसा पोलीस करीत आहेत.

  दरम्यान, हॉस्पीटलच्या वाहन चालकाने रूग्णवाहिकेलाच चावी लावून ठेवली होती. संशयित आरोपी हा पुर्वी एका खासगी हॉस्पीटलमध्ये वाहन चालक म्हणून नोकरीला होता. त्यामुळे त्याला रूग्णवाहिका चालवायला येत होती. सुदैवाने रूग्णवाहिकेचा चालवताना वाटेत संशयिताकडून अपघात घडला नाही, अन्यथा हॉस्पीटल व्यवस्थापनाचा गलथानपणा या अपघातांना कारणीभूत ठरला असता.            


हेही वाचा