
पणजी: स्व. मनोहर पर्रीकर हे आधुनिक गोव्याचे प्रणेते होते. त्यांनीच आधुनिक गोव्याचा पाया रचला होता. त्यांनी सुरू केलेली विकासकामे आमच्या कार्यकाळात पूर्ण झाली, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. शनिवारी पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी मिरामार येथील त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उत्पल पर्रीकर आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. गोव्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध कामे सुरू केली होती. ते हयात असताना यातील काही कामे पूर्ण झाली. मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण केली आहेत.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत गोवा आज वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. यासाठी आम्हाला स्व. पर्रीकर यांचे आशीर्वाद लाभले. आज आम्ही गोवा सरकार तसेच जनतेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत.
दामू नाईक म्हणाले की, स्व. मनोहर पर्रीकर यांनी केलेली कामे लोकांच्या नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी गोव्यासाठी केलेली कामे ही त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांनी मोपा विमानतळ, अटल सेतू (पूल) असे प्रकल्प राज्यात आणून गोव्याला आधुनिक बनवले. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना देखील त्यांनीच सुरू केली. त्यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांची कार्यपद्धती आम्ही पुढे नेत आहोत.
श्रीपाद नाईक यांनी पर्रीकर यांनी समाजासाठी राजकारण कसे करायचे असते, हे दाखवून दिल्याचे सांगितले. त्यांनी लोकांच्या हितासाठी राजकारण केले, असे ते म्हणाले. उत्पल पर्रीकर यांनी आपल्या वडिलांकडून सामाजिक आणि खासगी आयुष्यात कसे वागायचे असते, हे शिकायला मिळाल्याचे सांगितले.