'बर्च' दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; वागातोर येथील 'कॅफे CO2' सील

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब्सविरोधात सरकारी मोहीम तीव्र

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
'बर्च' दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; वागातोर येथील 'कॅफे CO2' सील

पणजी : हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमध्ये झालेल्या भीषण अग्नितांडवानंतर गोवा सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब्सविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, वागातोर (Vagator) येथील दोन प्रसिद्ध नाईटक्लब 'कॅफे Co2' आणि 'गोया' सील करण्यात आले आहेत.




'कॅफे CO2' वर कारवाईची कारणे

वागातोर येथील ओझरान टेकडीवर असलेल्या सुमारे २५० आसनी क्षमतेच्या 'कॅफे Co2' वर आज शनिवार, १३ डिसेंबर रोजी कारवाई करण्यात आली आहे. या क्लबकडे अग्निशमन दलाचा अग्निसुरक्षेशी निगडीत 'ना हरकत दाखला' (Fire Department NOC) नव्हता, तसेच बांधकामाला आवश्यक असलेली 'स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी' (संरचनात्मक स्थिरता) नसल्याचे आढळले. वरिष्ठ नागरी सेवा अधिकारी कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त अंमलबजावणी समितीने ही कारवाई केली.




'गोया' क्लबही सील

गुरुवारीच याच संयुक्त अंमलबजावणी समितीने वागातोर येथीलच प्रसिद्ध 'गोया' नाईटक्लब पूर्णपणे सील केला होता. कुळाच्या जमिनीत क्लबची उभारणी करणे, तसेच क्लबच्या काही महत्त्वाच्या परवान्यांमध्ये त्रुटी (discrepancies in certain permissions) आढळल्यामुळे 'गोया' क्लबवर कारवाई करण्यात आली होती.


Vagator nightclub Goya sealed by authorities amid permission discrepancies  - Herald Goa


समितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश

कबीर शिरगावकर यांच्या नेतृत्वाखालील या समितीमध्ये कार्यकारी अभियंता XXII (पीडब्ल्यूडी-मडगाव), निखिल पालेकर (पोलीस निरीक्षक, एस्कॉर्ट सेल), सुशील मोरसकर (स्टेशन फायर ऑफिसर), आणि आशिष राजपूत (कार्यकारी अभियंता, डिव्हिजन XIV, वेर्णा) यांचा समावेश होता. ही समिती बार्देश तालुक्यातील किनारी भागातील (coastal belt) क्लब्सची तपासणी करण्यासाठी खास नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या निर्देशानुसार बार्देशच्या मामलेदार यांनी क्लबला टाळे ठोकले.




हडफडे येथील दुर्घटनेनंतर सरकारने क्लब्सच्या सुरक्षा, परवान्यांची आणि नियमांच्या पालनाची कसून तपासणी सुरू केली आहे, याच पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात येत आहे.


हेही वाचा