चिंबला येथे जिल्हा पंचायत निवडणूक प्रचार सभेत दिले आश्वासन

पणजीः चिंबला येथील २० पॉईंट आणि हाऊसिंग बोर्डची घरे (20 Point and Housing Board Houses) कॉंग्रेसने (Congress) पाडण्यासाठी घेतली होती. मात्र, भाजप (BJP) सरकारने ‘माझे घर’ योजनेखाली घरे नावावर करणे सुरू केले. २०२७ पूर्वी चिंबला येथील सर्व घरे नावावर करणार असे आश्वासन मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी दिले.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी इंदिरा नगर चिंबल येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी स्थानिक आमदार रुडोल्फ फर्नांडिस, झेडपी उमेदवार गौरी कामत, चिंबलचे सरपंच संदीप शिरोडकर व इतर पाच सदस्य उपस्थित होते.
काँग्रेस सत्तेत असताना चिंबला येथे २० पॉईंट आणि हाऊसिंग बोर्डाची घरे पाडण्यासाठी काढली होती. मात्र, त्यावेळच्या आमदार व्हिक्टोरीया फर्नांडिस (मामी) यांनी त्याला विरोध केला आणि घरे वाचवली. आता त्यांचा पुत्र रुडोल्फ फर्नांडिस भाजप मध्ये येऊन ‘माझे घर’ योजनेखाली घरा वाचवण्यासाठी पुढे सरले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
चिंबलच्या चार पंचांनी मला सांगितले की, त्यांच्या प्रभागातील सर्व बुथवर ८० टक्के मतदान भाजपला होणार आहे. झाले नाही तर ‘माझे घर’ योजनेखाली त्यांची घरे नावावर करू नका, असे सांगितले आहे. त्यासाठीच या निवडणुकीत कमळावर मत मारा. २०२७ मध्ये सुद्धा कमळावर मत मारा आणि जेवढी घरे अनियमित आहेत ती सगळी घरे रुडोल्फ नावावर करून देणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
२० पॉईंट आणि हाऊसिंग बोर्डाची घरे इतरांना विकण्यात आली आहेत. ज्या लोकांनी ही पूर्वीची घरे विकत घेतली आहेत; त्यांच्याच नावावर ही घरे ‘माझे घर’ योजनेखाली होणार. पूर्वीचे मालक आता आपली कागदपत्रे लावून विकलेली घरे नावावर करायला लागले आहेत. पण याच्या पूर्वी ज्यांनी घरे विकली आहेत; त्यांच्या नावावर घरे होणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कॉंग्रेसला जात व धर्मा मध्ये भांडण लावायची सवय आहे. त्यासाठीच ज्यांनी ‘माझे घर’ योजनेला विरोध केला तेव्हा दारात आल्यावर पळवून लावा. तुम्ही कमळाला मत मारा; २०२७ च्या पूर्वी तुम्हाला घरे कायदेशीर करून देणार असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.