एलॉन मस्क यांचे वडील एरॉल रामलल्लांचरणी नतमस्तक; म्हणाले, भारताचा इतिहास, वेद...

अंगात कुर्ता पायजमा, गळ्यात हार- जय श्रीराम नावाच्या फिती, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या एरोल मस्कनी वेधलं साऱ्यांचं लक्ष

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
05th June, 03:28 pm
एलॉन मस्क यांचे वडील एरॉल रामलल्लांचरणी नतमस्तक; म्हणाले, भारताचा इतिहास, वेद...

पणजीः जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क आणि बहिण अलेक्झांड्रा मस्क यांनी बुधवारी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्यासह १६ जण होते. त्यांनी सुमारे ४० मिनिटे राम मंदिरात व्यतीत केली. यादरम्यान त्यांनी राम मंदिराबद्दल माहिती गोळा केली. ट्रस्टच्या लोकांनी एरॉल यांना रामलल्लाचा प्रसाद अर्पण केला. यानंतर एरॉल मस्क हनुमानगढीला पोहोचले. तिथेही त्यांनी पूजा आणि दर्शन केल्यानंतर मंदिराची परिक्रमा केली.


यावेळी त्यांनी संत आणि महंतांशी चर्चा केली. "मी इथे आलो याचा मला खूप आनंद आहे. मी मंदिर पूर्ण होईपर्यंत थांबू शकत नाही. हे भव्य मंदिर जगातील चमत्कारांपैकी एक ठरेल, हे अद्भुत आहे, माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक असल्याची भावना त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.


भारतीय संस्कृती आणि वेद यांबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले. 'भारताचा इतिहास अविश्वसनीय आहे. जगाचा इतिहास कोणत्या ना कोणत्या मार्गे भारताशी जोडलेला आहे, असं मला वाटतं. वेद १४ हजार वर्षे जुने असल्याचं सांगितलं जातं, मात्र ते त्याही आधीचे आहेत. वेदांमध्ये विमानांचा उल्लेख आहे. हे सगळं खूप आकर्षक आणि अविश्वसनीय आहे,' असेही एरॉल मस्क यांनी म्हटलं आहे.


दौऱ्यामागचे कारण
टेस्ला व स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांचे वडील एरॉल १ ते ६ जून अशा पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.  व्यावसायिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशांतर्गत ईव्ही चार्जिंग कंपनी ‘सर्वोटेक’च्या जागतिक सल्लागार मंडळात सामील झाल्यानंतर ते भारतात येत आहेत. भारत दौऱ्यातर ते आफ्रिकेला रवाना होणार आहेत.

हेही वाचा