मुलाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने वडिलांना तीव्र धक्का
सावंतवाडी : मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या मुलाचा धरणात बुडून मृत्यू होतो काय आणि तो धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही तासातच त्याचे वडील हे जग सोडून जातात काय. काल मंगळवारी सावंतवाडीत घडलेल्या या दुर्दैवी घटनांनी शहरवासिय हळहळले असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी शहरातील जुनाबाजार येथील १८ वर्षीय युवक क्रिश सावियो संभया हा मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास सावंतवाडीनजीकच्या कारीवडे धरणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता. धरणावर फोटो काढण्याच्या नादात क्रिशचा तोल जाऊन तो पाण्यात कोसळला.
ही घटना घडल्यानंतर तत्काळ पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी बाबल अल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमच्या सहाय्याने रात्री ८ वाजेपर्यंत धरणाच्या पाण्यात क्रिशचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर, रात्री ११ वाजता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना स्थानिकांना दिसला. त्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
क्रिशच्या अपघाती निधनाची माहिती घरी समजल्यावर त्याचे वडील सावियो संभया (४८) यांना मानसिक धक्का बसला. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आज बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचीही प्राणज्योत मालवली. बाप- लेकाच्या या निधनाने सावंतवाडीकर हळहळले.