संशयित व्यावसायिक रोहन हरमलकरला ईडीकडून अटक

जमीन हडप केल्याप्रकरणी १४ दिवसांची कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th June, 12:50 am
संशयित व्यावसायिक रोहन हरमलकरला ईडीकडून अटक

पणजी : जमिनी हडप केल्याप्रकरणी संशयित व्यावसायिक रोहन हरमलकर याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत अटक केली आहे. म्हापसा येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयाने बुधवारी त्याला १४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. हरमलकर यांनी २०२२ मध्ये कुंभारजुवे मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

ईडीने हरमलकरच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी आदी मालमत्तांवर छापा टाकून १ हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या हणजूण, हडफडे, आसगाव व अन्य ठिकाणच्या जमिनींची बनावट कागदपत्रे, ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली होती. 

गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हरमलकरविरोधात दोन प्रमुख गुन्हे दाखल केले आहेत. पहिली तक्रार हणजूण येथील सर्वे क्र. ४४४/८ मधील २,४५० चौ.मी. जमिनीसंदर्भात कॅनडातील स्थायिक जॉयसे एझाबेल पिंटो यांच्या मुखत्यारपत्रधारक अॅन्टोनियो डिकॉस्टा यांनी केली होती. त्यानुसार, हरमलकर (तिसवाडी), मॅथ्यू डिसोझा (मुंबई), देवानंद कवळेकर (पिळर्ण), पीटर वाझ (हणजूण), फेलिक्स नोरोन्हा (शापोरा) आणि धुळेर-म्हापसा येथील अल्कांत्रो डिसोझा, जुन डिसोझा, आर्किबाल्ड डिसोझा, थेरेझा डिसोझा, मॅक्सी डिसोझा, टीना डिसोझा, वॅरोनिका डिसोझा यांनी षड्‌यंत्र रचून बनावट दस्तऐवज तयार करून डिसोझा यांच्या नावावर करून घेतले. यावेळी हरमलकर याने डिसोझा कुटुंबीयांशी करार करून २८ जानेवारी २०१९ रोजी ती जमीन हरयाणा येथील आकाश आणि सीमा चौधरी यांना विकली.

दुसरी तक्रार बार्देशचे तत्कालीन निबंधक अर्जुन शेट्ये यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली होती, ज्यात हणजूण येथील सर्वे क्र. ४२६/५ मधील जमीन हडप केल्याचा आरोप होता. या दोन्ही प्रकरणांची म्हापसा पोलिसांनी नोंद करून ती एसआयटीकडे वर्ग केली.

चौकशीत दिशाभूल केल्याचा आरोप
- या दोन्ही एसआयटी प्रकरणांमध्ये हरमलकर याला विविध न्यायालयांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, या प्रकरणांची दखल घेऊन ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टिकोनातून चौकशी सुरू केली.
- ईडीने हरमलकर याच्या घरावर आणि इतर ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली आणि चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.
 - चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ईडीने त्याला अटक म्हापसा विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली.