सामान्यांसह उद्योग क्षेत्राला फायदा : प्रदूषण कमी होण्याचाही दावा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अॅपआधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सरकारने जारी केलेल्या ‘गोवा वाहतूक अग्रिगेटर नियमावली २०२५’ला राज्यातील, विशेषकरून किनारी भागातील टॅक्सी व्यावसायिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. असे असले तरी राज्यातील विविध औद्योगिक संघटनांनी अॅपआधारित टॅक्सी सेवेला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देणाऱ्यांमध्ये गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय), असोचॅम, गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन, वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन, लघू उद्योग भारती, गोवा टेक्नोलॉजी असोसिएशन आदी विविध संघटनांचा समावेश आहे. अॅपआधारित टॅक्सी सेवेमुळे सामान्यांसह उद्योग क्षेत्रालाही फायदा होणार आहे, असे मत या संघटनांनी व्यक्त केले आहे.
याबाबत जीसीसीआयने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अॅपआधारित टॅक्सी सेवा आता लक्झरी राहिलेली नसून ती एक गरज बनली आहे. उद्योग क्षेत्राची उत्पादकता नियमन केलेली अॅपआधारित टॅक्सी सेवा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील पर्यटन, उत्पादन, रिअल इस्टेट, किरकोळ विक्री, लॉजिस्टिक्स किंवा अन्य सेवा क्षेत्रातील व्यवसायांना अॅप टॅक्सीचा विश्वासार्ह आणि सुरक्षित वाहतूक पर्याय उपयुक्त ठरेल. अशी सेवा राज्यात अत्यावश्यक सुविधा आणते, कामगारांची कार्यक्षमता वाढवते व व्यवसाय सुलभता सुधारून राज्यात अधिक गुंतवणूकदार अनुकूल वातावरण तयार करते.
नवीन नियमावलीत डिजिटल वाहतूक सक्षम करून स्थानिक उपजीविकेचे संरक्षण करते. यातील चालकांना सरकार-अधिसूचित भाडे पूर्ण देणे, आरोग्य विमा, वाहन अनुदान तरतुदी महत्त्वाच्या आहेत. अॅपआधारित टॅक्सी सेवेमुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे रहदारी कमी होणे, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे पत्रकात म्हटले आहे. असोचॅम संघटनेने अॅप अग्रिगेटर नियमावलीची वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. अॅप टॅक्सीमुळे शहरी भागातून ग्रामीण भागात वाहतूक करणे सुलभ होणार आहे. यामुळे राज्यातील महत्त्वाच्या व्यावसायिक शहरांना वाहतूक करणे सोपे होणार आहे, असे असोचॅमने म्हटले आहे. वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनने अॅपआधारित टॅक्सी सेवेमुळे दळणवळण सोपे होऊन राज्यातील उद्योग क्षेत्राला फायदा होणार आहे, असे म्हटले आहे.
स्थानिक भागधारकांचे हित जपले जाईल
गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनने म्हटले आहे की, सरकारच्या नियमावलीत गोवा टॅक्सी, गोमंतकीय चालक आणि सरकारच्या नियमानुसार भाडे या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यामुळे राज्यातील टॅक्सी सेवा आधुनिक तर होईलच, शिवाय स्थानिक भागधारकांचे हितही जपले जाणार आहे.
काँग्रेसचा टॅक्सी व्यावसायिकांना पाठिंबा
काँग्रेसे मात्र अॅपआधारित टॅक्सी सेवेला विरोध जाहीर केला आहे. याविषयी राजपत्रात प्रसिद्ध केलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. याविषयी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या संघटना जो निर्णय घेतील, त्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले. टॅक्सी व्यावसायिक संघटनांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.