विशेष न्यायालयाचा निर्णय : दहा हजार रुपये, इतर अटींवर कारागृहातून बाहेर
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : ड्रग्ज प्रकरणात संशयिताविरोधात प्रथमदर्शनी पुरावे आहेत. दरम्यान, संशयिताच्या पत्नीचे नुकचेत निधन झाले आहे. तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहे. त्याला सहा मुले आहेत. माझ्या मते, अटी आणि शर्थीच्या अाधीन राहून संशयिताला जामीन मंजूर केला जाऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयाचे (एनडीपीएस) न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी संशयित महेश तूपकर (गिरी - बार्देश) याला १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर, तसेच इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, धुळेर फुटबॉल मैदानाजवळ ड्रग्जच्या तस्करीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य गाड व सहकारी पथकाने वरील ठिकाणी सापळा रचला. त्यावेळी एका व्यक्तीच्या हालचालींबाबत पथकाला संशय आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने स्वतःची ओळख महेश तूपकर (रा. गिरी-बार्देश) अशी दिली. झडती घेतली असता त्याच्याकडे २ लाख रुपये किमतीचा २०० ग्रॅम चरस सापडला. तो जप्त करण्यात आला. पोलिसांनी ड्रग्जविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी २१ एप्रिल २०२५ रोजी विशेष न्यायालयात (एनडीपीएस) आरोपपत्र दाखल केले. संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. संशयितातर्फे अॅड. नारायण एस. आमोणकर यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे प्रमाण परिवर्तनीय असल्याचा दावा केला. तसेच संशयिताच्या पत्नीचे हल्लीच निधन झाले आहे. तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असून त्याला सहा मुले आहेत, असेही न्यायालयाला सांगितले. दोन्ही पक्षांची बाजू एेकून घेतल्यानंतर न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित महेश तूपकरला १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व इतर अटींवर बुधवार, ४ जून रोजी सशर्त जामीन मंजूर केला.
संशयिताच्या वकिलांचा युक्तिवाद...
जप्त केलेल्या ड्रग्जचे प्रमाण परिवर्तनीय आहे.
संशयिताच्या पत्नीचे हल्लीच निधन झाले आहे.
संशयित महेश कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहे.
त्याला सहा मुले असून त्यांची जबाबदारी त्याच्यावरच आहे.