'रॅपिडो' लवकरच गोव्यात

गोव्यातील वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवण्याची तयारी.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10 hours ago
'रॅपिडो' लवकरच गोव्यात

पणजी :राज्य सरकारच्या नियोजित ॲप अग्रिगेटर धोरणाला सध्या अनेक स्तरांतून विरोधाचा सामना करावा लागतोय. तसेच अनेकांकडून या गोष्टीचे स्वागत देखील होत आहे. अशातच देशभरात अनेक ठिकाणी ॲप बेस्ड टॅक्सी आणि बाईक सेवा पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांचे लक्ष गोव्याकडे लागून राहिले आहे.

देशभरात २१५ हून अधिक शहरांमध्ये यशस्वीपणे सेवा देणाऱ्या ‘रॅपिडो’ या बाईक टॅक्सी आणि ऑटो सेवा पुरवणाऱ्या कंपनीनेही गोव्यात लवकरच प्रवेश करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी त्यांनी गोवा सरकारच्या ‘वाहतूक संकलक मार्गदर्शक तत्त्वे २०२५’ चा अभ्यास सुरू केला आहे. 'गोव्यातील नवीन नियम आधुनिक आणि सकारात्मक असून, यामुळे येणाऱ्या काळात टॅक्सी व्यवसायात सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे, असे रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली द हिंदू या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

नियम सर्वार्थाने फायदेशीर, राज्यात सेवा देण्यास कंपनी सज्ज

गोव्यातील नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सेवा सुरू करणाऱ्या कंपन्यांना स्थानिक कार्यालय, भारतात डेटा संचय आणि चालकांसाठी आरोग्य विमा यांसारख्या अटी पाळाव्या लागणार आहेत. त्यावर बोलताना गुंटुपल्ली म्हणाले, हे नियम भागीदारी आणि जबाबदारी जपणारे असून, सरकारच्या धोरणांना पूर्णतः सहकार्य करून 'रॅपिडो' सेवा देईल. सध्या कंपनी गोव्यात प्रत्यक्ष सेवा देत नसली तरी, नियम आणि नियमांशी निगडीत इतर गोष्टींची पूर्तता होताच तत्काळ कामाला सुरुवात करण्याची तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘रॅपिडो पिंक’ – महिला प्रवाशांसाठी महिला चालकांची विशेष सेवा

गोव्यात ‘रॅपिडो पिंक’ ही सेवा महिलांसाठी महिलांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास कंपनीला आहे. चेन्नईसारख्या शहरांत या सेवेची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. गुंटुपल्ली यांनी स्पष्ट केले की, रॅपिडो प्लॅटफॉर्मवर सहभागी झाल्यास चालकांच्या उत्पन्नात किमान ३०टक्के वाढ होते आणि कंपनी ‘शून्य कमिशन’ मॉडेलवर काम करते, जे चालकांच्या हिताचे आहे. गोव्यात स्थानिक टॅक्सी संघटनांशी सहकार्याची भूमिका ठेऊन काम करण्यावर रॅपिडोचा भर असेल असेही ते म्हणाले. 

गोव्यासाठी व्यापक दृष्टिकोन

रॅपिडो केवळ पर्यटनप्रधान भागातच नव्हे, तर शहरी आणि ग्रामीण भागांतही सेवा देणार आहे. रिअल-टाईम राईड ट्रॅकिंग, चालक पडताळणी आणि सुरक्षाविषयक अलर्ट्स ही त्यांच्या सेवेची वैशिष्ट्ये असतील. गोव्यातील पर्यटक, स्थानिक नागरिक आणि चालक – तिघांच्याही फायद्याचा दृष्टीकोन ठेऊनच काम केले जाईल. आम्ही सरकारबरोबर हातमिळवणी  गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यात मदत करू असेही गुंटुपल्ली यांनी सांगितले.


हेही वाचा