सांगे पोलिसांची कारवाई : तिघांना अटक, कार जप्त
प्रतिनिधी। गोवन वार्ता
सांगे : दाबामळ कोटार्ली सांगे येथे गुुरुवार, ५ जून रोजी सायं. ५.३० वा. देवाण-घेवाण सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकून सांगे पोलिसांनी ५.७५ किलो वजनाची, सुुमारे दहा कोटी रुपये किमतीची देवमाशाची उलटी जप्त केली. ही उलटी घेऊन आलेली कारही जप्त करण्यात आली.
देवमाशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. या उलटीचा वापर करून मोठमोठ्या ब्रॅण्डची अत्तरे तयार केली जातात. मासळीचा व्यवसाय केला जात असताना त्याच्याबरोबर या भागात देवमाशाच्या उलटीचाही व्यवसाय केला जात आहे, अशी माहिती पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. सांगेचे पोलीस निरीक्षक हितेंद्र नाईक, पोलीस उपनिरीक्षक कविता रावत, हेडकॉन्स्टेबल दिनेश नाईक, कॉन्स्टेबल अजय गावकर यांनी योग्य वेळ साधून सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून देवमाशाची उलटी आणि एक कार जप्त केली. तसेच रत्नकांत कारापूरकर (सांकवाळ), साईनाथ शेट (फोंडा) आणि योगेश रेडकर (सावंतवाडी) या संशयितांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शुक्रवारी सायंकाळी संशयितांना केपे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.