दामू नाईक : बी. एल. संतोष यांच्यासोबत साडेचार तास चर्चा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यात काय केल्यास पक्षासाठी योग्य आणि काय केल्यास अयोग्य ठरेल याबाबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासोबत चर्चा झाली. पुढील निर्णय दिल्लीतून घेतला जाईल. मंत्री गावडे यांच्याविषयी पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
रस्तामार्गे कर्नाटकला जाण्यासाठी गुरुवारी दाबोळी विमानतळावर उतरलेल्या संतोष यांची भेट घेऊन दामू नाईक यांनी त्यांच्याशी साडेचार तास चर्चा केली. संतोष शुक्रवारी सकाळी कारवारकडे गेले. गोवा आणि कर्नाटकातील राजकीय दौऱ्यानंतर शुक्रवारी रात्री ते दिल्लीला परतले.
बी. एल. संतोष दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर आपण त्यांच्यासोबत फातोर्डा येथे जेवण केले. त्यानंतर आम्ही पाळोळे-काणकोण येथील क्लाऊड नाईन सरोवर हॉटेलमध्ये पोहोचलो. पक्षांतर्गत बदल आणि गोव्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत आमच्यात तब्बल साडेचार तास चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षांतर्गत आणि राजकीय दोन्ही बाबतीत आपल्याला काय आणि कसे बदल हवेत, याची माहिती आपण त्यांना दिली. त्यानुसार लवकरच बदल होतील याची आपणास खात्री आहे, असेही दामू नाईक यांनी नमूद केले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या भेटीतील सविस्तर तपशील आपण उघड करू शकत नाही. पक्षांतर्गत आणि राजकीय बदलांबाबत आपली त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. पुढच्या काही दिवसांत त्यानुसार बदल होतील, अशी आपणास खात्री आहे.
_ दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप
आमदार मायकल लोबो दिल्लीत
गुरुवारी रात्री राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यात महत्त्वाची चर्चा सुरू असतानाच आता कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिल्ली गाठली आहे. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाविषयीच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर लोबो यांची दिल्ली भेट महत्त्वाची ठरत आहे. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन मायकल लोबो राज्यातील राजकीय स्थितीची माहिती त्यांना देणार आहेत. मंत्रिपद मिळण्याबाबत ज्या नावांची चर्चा आहे, त्यात मायकल लोबो यांचेही नाव घेतले जात आहे. काँग्रेसमधील आठ आमदारांना भाजपमध्ये आणण्यात मायकल लोबो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.