मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : GOA247.LIVE गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधीत सात ठिकाणी ईडीची छापेमारी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
31st May, 07:21 pm
मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : GOA247.LIVE गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधीत सात ठिकाणी ईडीची छापेमारी

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म GOA247.LIVE संदर्भात आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या अंतर्गत २९ मे रोजी दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथे एकूण ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले. ही कारवाई पंजाब अँड सिंध बँकेचे माजी अधिकारी बेदांशु शेखर मिश्रा, त्याचे सहकारी आणि GOA247.LIVE प्लॅटफॉर्मच्या प्रमुख व्यवस्थापकांविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या  तपासाच्या अनुषंगाने करण्यात आली.

७ ठिकाणी टाकलेल्या या छाप्यांमध्ये ३९ लाख रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन्स, सिम कार्ड्स, डिजिटल उपकरणे आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आलेत. याशिवाय ४८ 'म्युल अकाऊंट्स'मधील एकूण १.५ कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. ही खाती GOA247.LIVE प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येत होती, अशी माहिती ईडीने दिली. तपासात असेही समोर आले आहे की, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युवकांना आकर्षित करून ऑनलाइन सट्टा आणि मनी लॉन्ड्रिंगचे जाळे पसरवण्यात आले होते.

याप्रकरणी ईडीकडून पुढील तपास सुरू असून, आणखी आर्थिक व्यवहार व संशयित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा सट्टा व फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्सपासून सावध राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा