प्री मॅट्रिक एसटी शिष्यवृत्तीच्या उत्पन्नमर्यादेत वाढ

एसटी विद्यार्थ्यांना आर्थिक आधार, शिक्षणास प्रोत्साहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22 hours ago
प्री मॅट्रिक एसटी शिष्यवृत्तीच्या उत्पन्नमर्यादेत वाढ

पणजी : आदिवासी कल्याण खात्यातर्फे एसटी समाजातील प्री मॅट्रिक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नमर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी एसटी समाजातील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण कुटुंबाची वार्षिक उत्पन्नमर्यादा ३ लाख रुपये होती. आता ती वाढवून वार्षिक ५ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत १ ते ३ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
जुन्या योजनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ११ महिन्यांसाठी प्रति महिना ३२५ रुपये मदत दिली जात होती. आता ती वाढवून ११ महिन्यांसाठी प्रति महिना ३९० रुपये करण्यात आली आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना ११ महिन्यांसाठी प्रति महिना ३७५ रुपये मदत दिली जात होती. आता ती वाढवून ११ महिन्यांसाठी प्रति महिना ४५० रुपये करण्यात आली आहे. याशिवाय पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या व ५० टक्के हून अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक १०८० ते १९२० रुपये मदत दिली जाणार आहे.
एसटी विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती सुधारणे हा उद्देश
- प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना एसटी समजातील ५ वी ते १० वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. योजनेतील बदल २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहेत.
- या योजनेचा उद्देश अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती सुधारणे आहे. याद्वारे गरिबीमुळे शाळेत पाठवू शकत नसलेल्या, शाळा सोडाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येते.
- ही योजना २००६ मध्ये सुरू करण्यात आली होती. यामध्ये वेळोवेळी बदल करून शिष्यवृत्ती रक्कम वाढवण्यात आली आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक एसटी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या अथवा सीएम स्कॉलरशिप पोर्टलवर नोंदणी करावी.