संशयित ‘नॉट रिचेबल’; कारवाईने राजकारण्यांचेही धाबे दणाणले
🔎 पणजी : जमीन हडप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोव्यात टाकलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या छापा प्रकरणात अडकलेला संशयित रोहन हरमलकर बार्देश आणि तिसवाडीतील काही राजकीय नेत्यांच्या जमीन गुंतवणुकीत मध्यस्थ आहे. रोहनच्या मालमत्तांवर ‘ईडी’कडून झालेल्या कारवाईमुळे अशा नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
📜 राज्यात गेल्या काही वर्षांत गाजलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करण्याच्या प्रकरणांत ‘ईडी’कडून छापासत्र सुरू आहे. अशा प्रकरणात गुन्हे शाखेने याआधी हरमलकर याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. त्यातील एका प्रकरणात पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तर, दुसऱ्या प्रकरणात अर्ज फेटाळला होता.
💰 ‘ईडी’ने शुक्रवारी हरमलकर याच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर छापा टाकला. त्यात एक हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या हणजूण, हडफडे, आसगाव आणि इतर ठिकाणच्या जमिनींची बनावट कागदपत्रे तसेच ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची अस्सल कागदपत्रे जप्त केली. याशिवाय त्याच्या पिळर्ण येथील घरालाही टाळे ठोकले आहेत.
👥 दरम्यान, बार्देश आणि तिसवाडीतील काही राजकीय नेत्यांनी रोहन हरमलकरच्या नावे जमिनी घेऊन गुंतवणूक केल्याचे याआधीही स्पष्ट झाले होते. त्यात आता ‘ईडी’ने त्याच्या मालमत्तांवर टाच आणल्याने संबंधित राजकीय नेतेही अडचडणीत सापडण्याची शक्यता आहे.
🔍 ‘ईडी’कडून रोहन हरमलकर याची चौकशी होणार आहे. शुक्रवारी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना तो घरी सापडलेला नव्हता. शनिवारीही तो अधिकाऱ्यांना सापडला नसल्याने त्याच्या शोधास अधिकाऱ्यांनी गती दिली असल्याचे सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.
🗳️ रोहन हरमलकर याने गत विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावले होते. कुंभारजुवे मतदारसंघातून अपक्ष म्हणून त्याने निवडणूक लढवली होती। त्याला ३,७८४ मते मिळाली होती। या निवडणुकीत तो तिसऱ्या स्थानी राहिला होता। काँग्रेसच्या उमेदवारीवर उभे राहिलेल्या राजेश फळदेसाई यांनी ६,६०१ मते मिळवत विजय प्राप्त केला। भाजपच्या उमेदवारीवर उभ्या राहिलेल्या जेनिता मडकईकर ३,८४८ मते घेऊन दुसऱ्या स्थानी राहिल्या होत्या।
📄 गत विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात रोहन हरमलकरने सुमारे १२.१३ कोटींची मालमत्ता दाखवली होती. त्यात त्याने आपल्याकडे रोख ४.३० लाख, बँक खात्यांत १७.७९ लाख, २.१० कोटींची वाहने, ७.६८ लाखांचे सोने, ९.१७ कोटींची बिगर कृषी जमीन आणि ६० लाखांची निवासी इमारत असल्याचे म्हटले होते. परंतु, ‘ईडी’ने छाप्यात ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची अस्सल कागदपत्रे त्याच्याकडून जप्त केली आहेत.