बार्देश : लोकांना खुणावताहेत लाखो रुपयांची बक्षिसे!

संगीताचा कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पडद्यामागे चालतोय कोट्यवधींचा धंदा.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
बार्देश : लोकांना खुणावताहेत लाखो रुपयांची बक्षिसे!

पणजी : दक्षिण गोव्यानंतर आता उत्तर गोव्यातही हाऊझीचे (लकी ड्रॉ आणि जुगाराचा प्रकार) लोण पसरू लागले आहे. अलीकडील विविध कार्यक्रमांमध्ये जवळपास ७ लाख रुपयांहून किमतीची बक्षीसे जिंकल्याचे समोर आले होते. उत्तर गोव्यात विशेषतः बार्देश तालुक्यात दर्यादेग परिसरात अशा हावशीचे आयोजन निर्बंधांशिवाय सुरू झाले आहे. संगीत कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून, यात सहभागी होण्यासाठी कुपन्स विकले जात आहेत.

रोख रकमेची बक्षिसे, स्पर्धेसाठी ठरावीक परवानग्या व मोठ्या प्रमाणात मिळणारा परतावा यामुळे हाउझीची क्रेझ आयोजकांना तसेच सहभागी नागरिकांना स्वस्थ बसू देत नाही. ज्या ठिकाणी हाऊझी असेल त्याठिकाणी गर्दी ही हमखास होतेच. या खेळातील लाखोंच्या बक्षिसांच्या रकमेवरील अर्थकारणाने लक्ष वेधून घेतलेले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, कळंगुट-बागा भागात झालेल्या एका भव्य संगीत कार्यक्रमात केवळ हजार रुपयांत हाऊझीची तीन कुपन्स  विकली गेली होती. यातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याने तब्बल ७ लाख रुपये बक्षीस जिंकले. इतर विजेत्यांनीही चांगल्या रकमेची बक्षिसे पटकावली. याच प्रमाणे, कळंगुट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेनंतर झालेल्या हाऊझीमध्ये ५०० रुपयांत ३ कुपन्सची विक्री झाली. यातील विजेत्याने १ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. तसेच पर्रा पंचायत फुटबॉल कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतरही हाऊझीचे आयोजन झाले, यात विजेत्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. विशेष म्हणजे यासाठी कुपन्स ही मोफत वाटण्यात आली होती.

दरम्यान, या बक्षिसामुळे त्यांना घर दुरुस्तीपासून, कर्ज फेडणे, मुलांचे शिक्षण, त्यांच्या लग्नकार्याच्या खर्चापर्यंत अनेक गरजा पूर्ण करता येतील असे बक्षिसे जिंकणाऱ्यांनी गोवन वार्ताशी बोलताना सांगितले.  दरम्यान आता हाती आलेल्या माहितीनुसार, शिवोली, हणजूण आणि हडफडे परिसरातही अशाच प्रकारे संगीत व क्रीडा कार्यक्रमाच्या पडद्याआड हाऊझीचे आयोजन येत्या काही दिवसांत केले जाईल. 

दक्षिण गोव्यातही म्युझिकल शो, फुटबॉलच्या स्पर्धा, कराओके स्पर्धा अशा कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक ठिकाणी हाऊझी खेळ आयोजित केला जात आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येत आहेत. याच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहेत. तसेच आयोजक संबंधित उपजिल्हाधिकाऱ्याकडून संगीत कार्यक्रमांचे परवाने घेऊन हाऊझी आयोजित करत असल्याची माहिती देणाऱ्या तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हाधिकाऱ्याकडे दाखल केल्या. त्यात संगीत कार्यक्रमांच्या परवानगीचा गैरवापर करून हाउझी स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याची अनेक उदाहरणे नोंदवली गेली आहेत. 

याची दखल घेऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी मागे दक्षिण गोव्यातील सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. त्यात त्यांनी संगीत कार्यक्रमांना परवानगी देताना काही नियम अटी घालण्याची सूचना केल्या. तसेच त्या ठिकाणी मामलेदार किंवा तलाठ तैनात करण्यास सांगितले आहे. परवानगीचा अर्ज आल्यानंतर त्याची खातरजमा करण्यास सांगितले आहे. याशिवाय संगीत कार्यक्रमांचे किंवा इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ काढण्यास सांगितले. असे असताना त्या ठिकाणी हाऊझीचे किंवा इतर प्रकारचे जुगार होत असल्याचे नजरेस आल्यास पोलिसांना पाचारण करून असे प्रकार तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले.

हाऊझी/ तांबोला म्हणजे नक्की काय?

हाऊझी किंवा तांबोला हा नंबरचा खेळ आहे. यात १ ते ९० क्रमांकांचा समावेश असून केवळ १५ क्रमांक असलेली कूपन्स सहभागींना दिली जातात. त्यानंतर आयोजक लकी ड्रॉप्रमाणे नंबर काढून जाहीर करतात व नागरिक आपल्या तिकीटावर तो क्रमांक शोधून त्यावर काट मारत असतात. टॉप लाइन, मिडल लाइन, बॉटम लाइन यासह जल्दी फाइव्ह व फुल्ल हाऊस असे प्रकार असतात, त्यात जल्दी फाइव्हला लोक जास्त पसंद करतात.

परताव्यातून खेळाडूंना, कलाकारांनाच अर्थसहाय्य : आयोजक

 आयोजकांच्या म्हणण्यानुसार, स्पर्धांच्या ठिकाणी प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी हाऊझींचा वापर केला जात आहे. आलेल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून देखील याकडे पाहिले जाते. यातून जे पैसे मिळतात, त्याचा वापर हा खेळाला, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, म्युझिकल शोचा खर्च काढून कलाकारांना थोडा आर्थिक हातभार देण्यासाठी केला जातो. यासाठी आवश्यक त्या परवानगी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येते असे आयोजक सांगतात.

दरम्यान मागे गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस यांनी 'हाऊझी'वर घातलेल्या बंदीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. गावपातळीवरील फुटबॉल स्पर्धांसाठी हाऊजी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते. यावर मुख्यमंत्र्‍यांकडून त्यांना पूर्ण सहकार्याची हमी देण्यात आली होती.  मध्यंतरी हाऊझीमध्ये कमी किमतीची बक्षीसे होती तोपर्यंत ठीक होते. आता बक्षिसांची रक्कम वाढलेली असल्याने आयोजकांविरोधात कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. 


हेही वाचा