दिल्ली : आज ७१ मान्यवरांचा पद्म पुरस्कारांनी होणार सन्मान

दुसऱ्या टप्प्यात उर्वरित विजेत्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
दिल्ली : आज ७१ मान्यवरांचा पद्म पुरस्कारांनी होणार सन्मान

नवी दिल्ली : गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांचे वितरण आज सोमवार, २८ एप्रिल सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या सोहळ्यात ७१ विभूतींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

आजच्या सोहळ्यात ४ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि ५७ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले जातील. उर्वरित ६८ विजेत्यांना पुढील महिन्यात दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यंदा एकूण १३९ व्यक्तींची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली असून त्यामध्ये ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, यंदाच्या पुरस्कारांमध्ये २३ महिलांचा समावेश आहे, तसेच १० विदेशी, एनआरआय, पीआयओ व ओसीआय श्रेणीतील व्यक्तींनाही सन्मानित करण्यात येणार आहे. १३ व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहेत, यात भोजपुरी गायिका शारदा सिन्हा, सुजुकी कंपनीचे ओसामु सुजुकी यांचा समावेश आहे.

पद्मश्री प्राप्तकर्ते:

गायक अरिजीत सिंह, बँकर अरुंधती भट्टाचार्य, क्रिकेटपटू आर. अश्विन, अभिनेते अशोक सराफ, शास्त्रज्ञ अद्वैत गडनायक, साहित्यिक रामचंद्र पालव आदींसह विविध क्षेत्रातील ११३ व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.

पद्म भूषण प्राप्तकर्ते:

ए. सूर्यप्रकाश, अभिनेते अनंत नाग, बिबेक देबरॉय (मरणोत्तर), जतिन गोस्वामी, कैलाशनाथ दीक्षित, नंदमुरी बालकृष्ण, पी. आर. श्रीजेश, शेखर कपूर, साध्वी ऋतंभरा, पंकज पटेल यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश.

पद्म विभूषण प्राप्तकर्ते:

दुव्वुर नागेश्वर रेड्डी, माजी सरन्यायाधीश जगदीश सिंह खेहर, नृत्यांगना कुमुदिनी लाखिया, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, तसेच मरणोत्तर - एम. टी. वासुदेवन नायर, ओसामु सुजुकी आणि शारदा सिन्हा.

हेही वाचा