पेडणे : बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी हरमल येथे रशियन महिलेस अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 05:04 pm
पेडणे : बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी हरमल येथे रशियन महिलेस अटक

पणजी : व्हिसाची मुदत संपूनही गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य करून राहणाऱ्या एका रशियन महिलेला हरमल येथून अटक करण्यात आली असून, संबंधित गेस्ट हाऊस मालकावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मांद्रे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाळ्येकर यांच्या तक्रारीवरून २६ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांनी पेट्रोलिंगदरम्यान हरमल येथील खालचावाडा परिसरात एका परदेशी महिला पर्यटकाला थांबवून तपासणी केली असता, तिने आपले नाव याना इगोरवना मकेबा (वय ३७, रशिया) असे सांगितले. तपासणीदरम्यान तिच्या व्हिसाची मुदत संपली असल्याचे आढळले आणि ती बेकायदेशीरपणे गोव्यात राहत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तिला  १९४८ च्या परदेशी आदेशाच्या कलम ७(१)(३) आणि १९४६ च्या परदेशी कायद्याच्या कलम १४ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन अटक केली आहे. 

गेस्ट हाऊस मालकावरही कारवाई

चौकशीत ही महिला गेल्या महिन्यापासून खालचावाडा, हरमळ येथील 'व्हिला ओशनिक गेस्ट हाऊस'मध्ये वास्तव्यास होती, असे आढळून आले. गेस्ट हाऊसचे मालक लिओनार्डो ग्रासियस डिसोझा ( ७९) यांनी संबंधित परदेशी महिलेच्या वास्तव्यासाठी अनिवार्य असलेला 'सी' फॉर्म विदेशी नोंदणी कार्यालयात सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या विरोधातही परकीय आदेश १९४८ च्या कलम १६ आणि परकीय कायदा १९४६ च्या कलम १४(सी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास मांद्रे पोलीस करत आहेत.

हेही वाचा