पोलिसांकडून तीन दिवसांत १४,०८९ भाडेकरूंची पडताळणी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अल्पकालीन व्हिसावर राज्यात असलेल्या तीन पाकिस्तानी नागरिकांनी गोव्यासह देश सोडल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, गोवा पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत भाडेकरू पडताळणी मोहिमेअंतर्गत १४,०८९ जणांची चौकशी करून काही जणांना प्रतिबंधात्मक अटकही केली.
काहीच दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी केंद्र सरकारने विविध प्रकारच्या व्हिसांवर गोव्यासह भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले होते. गोव्यात अल्पकालीन व्हिसावर तीन पाकिस्तानी नागरिक होते. त्यांना केंद्राच्या निर्देशानुसार गोवा आणि देश सोडण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या होत्या. त्यानुसार तिन्ही पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. दरम्यान, तीन पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसावर गोव्यात होते. तर, १७ जण दीर्घकालीन व्हिसावर गोव्यात आले आहेत.
सरकार सतर्क; भाडेकरू पडताळणीवर भर
पहलगाम हल्ल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. गोवा पोलिसांनी तीन दिवसांपासून राज्यभर भाडेकरू पडताळणी मोहीम सुरू केली असून, इतर राज्यांतून गोव्यात आलेल्यांच्या चौकशीसह बेकायदेशीररीत्या गोव्यात राहणाऱ्या विदेशी नागरिकांचाही शोध सुरू केला आहे. या तीन दिवसांत उत्तर गोव्यातील ९,८९१, तर दक्षिण गोव्यातील ४,१९८ असे मिळून १४,०८९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील काही जणांवर प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई करण्यात आली.