मुख्यमंत्र्यांचा विश्वास : ताळगावात भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सार्वजनिक बांधकाम, गोवा लोकसेवा आयोग, तसेच विविध खात्यांमध्ये येत्या दोन वर्षांत १० ते १२ हजार नोकऱ्या तयार होणार आहेत. यातील ४ हजार नोकऱ्या या मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे भरल्या जातील. केंद्र तसेच राज्य सरकारला युवकांच्या भवितव्याची चिंता आहे. त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी विविध अभ्यासक्रम, तसेच उपक्रम सरकारने सुरू केले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चितपणे बदला घेतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
ताळगाव येथे रविवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार जेनिफर मोन्सेरात, सिद्धार्थ कुंकळ्येकर व इतर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जे उच्चविद्याविभूषित आहेत, त्यांना नोकऱ्या मिळणारच आहेत; परंतु दहावी, बारावी नापास झालेल्या युवकांचीही सरकारला चिंता आहे. यासाठी कौशल्यतेवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अप्रेंटिसशीप योजनेचा १४ हजार युवकांना लाभ झाला आहे. या योजनेमुळे युवकांना कामाचा अनुभव मिळाला. शिवाय कामाची माहितीही मिळाली.
भारतीय जनता पक्ष हा देशासाठी काम करणारा पक्ष आहे. ‘देशहित प्रथम’ हे पक्षाचे तत्त्व आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देश चिंताग्रस्त बनला आहे. दहशतवाद व दहशतवाद्यांना योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समर्थ आहेत. १९४७ ते १९९९० पर्यंत तत्कालीन राज्यकर्त्यांनी घातलेल्या खतपाणीमुळे दहशतवाद वाढला. दहशतवादाविरोधातील लढाई तीव्र करण्यात आली असून पाकिस्तानी लोकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रदेशाध्यक्षपदी दामूंचे १०० दिवस पूर्ण
भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन दामू नाईक यांना रविवारी १०० दिवस पूर्ण झाले. याचे औचित्य साधून या मेळाव्यात त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा ‘आमचो दामू नाईक @१००’ हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला.
पुढील काळातही डॉ. सावंतच मुख्यमंत्री हवेत : जेनिफर
मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यानी ताळगावसह गोव्याचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. पुढील कार्यकाळातही तेच मुख्यमंंत्रीपदी हवेत, असे ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यावेळी म्हणाल्या. जुवारी नदीवरील पूल, मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटल असे अनेक प्रकल्प मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांंच्या कार्यकाळात पूर्ण झाले. युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी ‘मुख्यमंंत्री कौशल्य योजना’ तसेच इतर उपक्रमही सुरू झाले आहेत. डबल इंंजीन सरकारमुळे गोव्यासह देशाचा झपाट्याने विकास होत आहे. ताळगाव मतदारसंंघात १३.२० कोटी रुपये खर्चून रस्ते हॉटमिक्स करण्यात आले. फुटबॉल मैदानाच्या विकासासह इतर कामे पूर्ण होणार असल्याचे जेनिफर मोन्सेरात यांनी सांंगितले.
स्वयंंसाहाय्य गटांंकडून ३४० कोटींची उलाढाल
राज्यातील ३४२ स्वयंंसाहाय्य गटांंकडून वर्षाला ३४० कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. याचा राज्यातील ४८ हजार महिलांना लाभ होत आहे. ‘मोदी की गॅरंटी’मुळे स्वयंसाहाय्य गटांना २० लाख रुपयांंपर्यंत कर्ज मिळणे शक्य झाले आहे. हमीशिवाय कोणालाही एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मिळत नव्हते. रेशनवर मोफत तांंदूळ देण्याच्या योजनेचा साडेपाच लाख गोमंंतकीयांना लाभ होत आहे. क्लीन इंडिया, फीट इंंडिया, स्कील इंडिया अशा मोहिमा पंंतप्रधान मोदींनी सुरू केल्या. याचा लाभ गोव्यासह सर्व देशाला होत आहे. युवा शक्ती, नारी शक्ती, किसान आणि गरीब कल्याण या चार सूत्रांनुसार भाजप सरकारची वाटचाल सुरू आहे, असे मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.