कळणेत ओंकार हत्तीची पुन्हा दहशत; हल्ल्यात बैलाचा तडफडून मृत्यू

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
11th December 2025, 03:26 pm
कळणेत ओंकार हत्तीची पुन्हा दहशत; हल्ल्यात बैलाचा तडफडून मृत्यू

दोडामार्ग : गोवा (Goa) राज्यातील फोंडये परिसरातून कळणे मायनिंग मार्गे कळणे गावात बुधवारी सायंकाळी दाखल झालेल्या जंगली ‘ओंकार’ हत्तीने (Onkar Elephant) रात्री उशिरा मोठा कहर केला. शेतकरी (Famer) शाहिर इस्माईल खान यांच्या शेतात बांधून ठेवलेल्या पाळीव जनावरांकडे हत्तीने वाटचाल केली आणि अचानक हल्ला चढवला.  त्यात एका बैलाचा बळी गेला. 

या हल्ल्यात वनखात्याच्या कर्मचार्‍यांनी दोन जनावरांचे दोर (दावी) तोडल्याने ते वाचले असले तरी तेथे बांधलेल्या तिसऱ्या बैलाचा ओंकारच्या हल्ल्यात बळी गेला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले असून, संतप्त बनले आहेत. 

हत्ती आक्रमक झाला असल्याचे लक्षात येताच वनखात्याच्या कर्मचार्‍यांनी दोन जनावरांचे दोर (दावी) सोडले. मात्र, हातात कोयता नसल्याने तिसऱ्या बैलाचे दावे कापता आले नाही.  तोपर्यंत संतप्त ओंकार हत्तीने  बैलावर जोरदार हल्ला केल्याने तडफडुन मृत्यू पावला.

त्यानंतर हत्तीने परिसरातील केळी बागायतीचेही मोठे नुकसान केले. याबाबतची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. सावंतवाडी तालुक्यात काही दिवसांपूर्वी हत्तीने केलेल्या हल्ल्यात म्हैस मृत्यू पावली होती; त्यानंतर आता बैलाचा बळी गेला. त्यामुळे कळणे आणि आसपासच्या भागात शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती पुढे भिकेकोनाळ दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते.

सरपंच अजित देसाई यांची तीव्र प्रतिक्रिया

कळणेचे सरपंच अजित देसाई यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत म्हटले,  “नुकसानी टाळण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण तरीही वाईटच झाले. निदान शेतकऱ्याला त्वरित भरपाई तरी मिळावी आणि हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.” “वनखाते आणि स्थानिक ग्रामस्थ सोडले तर अशा प्रसंगी एकही प्राणीमित्र मदतीसाठी पुढे येत नाही. फक्त सोशल मीडियावर भूमिका मांडून काही होत नाही; जमिनीवर उतरून काम केले तर शेतकरी काय भोगतो हे कळेल.”

शेतकरी संघटना प्रतिनिधी विलास सावंत यांची टीका

शेतकरी संघटना प्रतिनिधी विलास सावंत यांनी देखील कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “ओंकारच्या बचावासाठी उपोषण, आंदोलन करणारे आता कुठे आहेत? निदान या शेतकऱ्यांना भेटून सांत्वन करणे किंवा नुकसानभरपाईबाबत पाठपुरावा करणे त्यांना गरजेचे वाटले नाही.” “कुचकामी आणि बेगडी प्राणीप्रेमामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान भरून येत नाही. शेतकऱ्यांच्या जीवित आणि संपत्तीच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेच पाहिजे.”

एकूणच आता दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी वर्गात  हत्तीकडून होणाऱ्या शेती बागायतीचे अतोनात नुकसान आणि आता माणसे व त्यानंतर हत्ती पाळीव जनावरांचे बळी घेऊ लागल्याने शेतकरी वर्ग  आक्रमक बनत आहे.