रेडकर, बागकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

बर्च बाय रोमिओ लेन अग्नितांडव प्रकरण : अटकेपासून अंतरिम संरक्षण


12th December, 11:45 pm
रेडकर, बागकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमधील अग्नितांडव प्रकरणी हणजूण पोलिसांनी म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने हडफडे-नागवाचे सरपंच रोशन रेडकर व तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी मंगळवार, १६ डिसेंबरपर्यंत म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने तहकूब केली. तोपर्यंत दोघांनाही अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले आहे.
शुक्रवारी सुनावणीवेळी रेडकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. नितीन देसाई, तर बागकर यांच्या वतीने अॅड. राजू पोवळेकर व अॅड. जिग्नेश कोटकर उपस्थित होते. सरकारी वकील जेनिफर सांतामारिया आणि हणजूण पोलीस उपनिरीक्षक साहील वारंग उपस्थित होते. रेडकर व बागकर यांनी आग दुर्घटना प्रकरणात पोलीस अटक करतील, या भीतीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी हणजूण पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात सविस्तर म्हणणे सादर करण्यास मंगळवारपर्यंत वेळ देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी मंजूर केली. पुढील तारखेपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली.
कोहलीला सहा दिवसांची पोलीस कोठडी
रोमिओ लेनचे गोवा प्रमुख संशयित करणसिंग कोहली (दिल्ली) याला न्यायालयाने अतिरिक्त ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोमवार, ८ रोजी गोवा पोलिसांनी दिल्ली येथून संशयिताला अटक केली होती. त्याला गोव्यात आणल्यानंतर हणजूण पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. तेव्हा त्याला अतिरिक्त सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पोलिसांकडून ५० जणांचे जबाब नोंद
दरम्यान, या दुर्घटना प्रकरणी हणजूण पोलिसांनी सुमारे ५० जणांचे जबाब नोंद केले. त्यामध्ये अधिकारी, कामगार व जखमी पीडितांचा समावेश आहे. दरम्यान, क्लबचे मालक संशयित सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांना थायलंडमधून देशात आणण्याची प्रक्रिया सुरू असून गोवा पोलीस सीबीआय आणि इतर केंद्रीय संस्थांशी समन्वय साधून असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.