बेलारुसच्या महिलेला अटक : सापडले १.३२१ किलो डीएमटी

पणजी : केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने पेडणे पोलिसांच्या मदतीने पेठवाडा-कोरगाव येथे मोठी कारवाई केली. येथील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकून १ कोटी रुपये किमतीचे १.३२१ किलो ‘डीएमटी’ ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी बेलारुसची नागरिक इना वोल्कोवा या महिलेला अटक करण्यात आली.
संयुक्त कारवाईचा तपशील
एनसीबीच्या गोवा विभागाला पेठवाडा-कोरगाव येथील एका भाड्याच्या खोलीवर राहणारी विदेशी महिला ड्रग्ज तस्करीत गुंतल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानुसार उपसंचालक नितीन गहवाल, अधीक्षक विशाल पवार, निरीक्षक मोहन राणे व इतर पथकाने पेडणे पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार ९ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान ही संयुक्त कारवाई केली.
एक कोटींचे ड्रग्ज जप्त
या कारवाईत पथकाने बेलारुस नागरिक इना वोल्कोवा हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून १ कोटी रुपये किमतीचे वेगवेगळे प्रकारचे १.३२१ किलो डीएमटी ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यानंतर एनसीबीचे निरीक्षक मोहन राणे यांनी संशयित इना वोल्कोवा हिच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम ८(सी), आरडब्ल्यू २२(सी), २८ व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अटक करण्यात आलेल्या महिलेला पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सुरुवातीला दोन दिवस एनसीबी कोठडी सुनावली. ही मुदत संपल्यानंतर संशयित महिलेला ११ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.